मृत्यूपूर्व बयान फेटाळता येणार नाही : पूर्णपीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:26 PM2018-03-09T22:26:16+5:302018-03-09T22:26:27+5:30
मृत्यूपूर्व बयान मयताला वाचून सांगितले नसेल व मयताने संबंधित बयान योग्य असल्याचे मान्य केले नसेल, अशावेळी केवळ या एकमेव कारणावरून मृत्यूपूर्व बयान पूर्णपणे फेटाळता येणार नाही, असा निर्णय पूर्णपीठाने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील तीन सदस्यीय पूर्णपीठाने मृत्यूपूर्व बयानावर अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. मृत्यूपूर्व बयान मयताला वाचून सांगितले नसेल व मयताने संबंधित बयान योग्य असल्याचे मान्य केले नसेल, अशावेळी केवळ या एकमेव कारणावरून मृत्यूपूर्व बयान पूर्णपणे फेटाळता येणार नाही, असा निर्णय पूर्णपीठाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयांना यापुढे हीच भूमिका ठेवून निर्णय द्यावे लागणार आहेत.
न्या. रवी देशपांडे, न्या. सुनील शुक्रे व न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या पूर्णपीठाने हा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या मुद्यावरून उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या द्विसदस्यीय न्यायपीठात मतभिन्नता झाली होती. ‘शिवाजी पाठदुखे’ व ‘अब्दुल रियाज’ प्रकरणात संबंधित द्विसदस्यीय न्यायपीठानी मयतास मृत्यूपूर्व बयान वाचून दाखवण्यात आले नाही व ते बयान बरोबर असल्याचे मयताने कबूल केले नाही म्हणून, मृत्यूपूर्व बयान फेटाळले होते. तसेच, प्रकरणातील आरोपींना निर्दोष सोडले होते. ‘गणपत लाड’ प्रकरण निकाली काढणाºया द्विसदस्यीय न्यायपीठाने यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. मयताला मृत्यूपूर्व बयान वाचून दाखवण्यात न आल्याने व ते बयान बरोबर असल्याचे मयताने कबूल न केल्याने संपूर्ण मृत्यूपूर्व बयान फेटाळता येणार नाही, असे या न्यायपीठाने स्पष्ट करून आरोपीचे दोषत्व कायम ठेवले. तसेच, या भिन्न भूमिकांवर पूर्णपीठाकडून योग्य खुलासा होण्यासाठी सदर मुद्दा मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविला. त्यावर पूर्णपीठाने हा खुलासा करताना सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे विविध निर्णय लक्षात घेतले. या मुद्यावर अॅड. आनंद देशपांडे, अॅड. राहुल धांडे, अॅड. सुमित जोशी, अॅड. पी. आर. अग्रवाल व अॅड. अमित किनखेडे यांनी युक्तिवाद केला.