नागपूर : जरीपटक्यात रविवारी दुपारी झालेल्या निर्घृण दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये असंतोष धगधगत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर जोरदार लाठीमार करून आगीत तेल टाकले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हत्याकांडातील आरोपीच्या घरावर हल्ला चढवला. आरोपी आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रास्ता रोको, दगडफेक केली आणि पोलीस ठाण्यावर अंत्ययात्रा नेऊन रोष व्यक्त केला.जरीपटक्यातील समता नगरात राहाणारा गुंड प्रशांत अर्जुन चमके (वय ४०), त्याची पत्नी गीता चमके (वय ३१), झनक मुन्नालाल तोमस्कर (वय ४५), त्याचा मुलगा अंकुश (वय २२), झनकचा जावई आणि वंदना चमके (वय ३५) या सहा जणांनी शेजारच्या ईमरत राणा यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. सांडपाण्याच्या नालीची सफाई का केली नाही, असे विचारत आरोपी प्रशांत चमके झनक आणि त्यांच्या साथीदारांनी रविवारी सकाळी ९ वाजता राणाच्या घरावर हल्ला चढवला. ईमरत राणाला चाकूने भोसकले आणि विटांनी ठेचले. तर त्यांची पत्नी सुनीता (वय ३०) यांना केस धरून फरफटत नेले. ते पाहून ईमरतचा भाऊ पुरणलाल राणा लहान भावाच्या मदतीला धावला. आरोपींनी त्याच्यावरही चाकूचे सपासप घाव घातले. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने समतानगरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांमुळेच निर्ढावला चमकेआरोपी चमके हा या भागात खुलेआम अवैध दारूची विक्री करायचा. विरोध करणाऱ्यांना मारहाण करायचा, धमक्या द्यायचा. जरीपटका पोलिसांना मोठा हप्ता मिळत असल्याने त्याला पोलीस अभय द्यायचे. त्याच्याविरोधात तक्रार आली तरी लक्ष देत नव्हते. परिणामी चमके कमालीचा निर्ढावला होता. अलीकडे चमकेसोबत तोमस्करचीही गुंडगिरी वाढली होती. या भागातील नागरिकांना खास करून महिला मुलींना त्याचा फारच त्रास होत होता. मात्र, पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा नसल्याचे माहीत असल्याने नागरिक तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा, तसा चमके आणि त्याच्या साथीदारांचा त्रास सहन करीत होते. पोलिसांच्या भूमिकेमुळेच चमके आणि त्याच्या साथीदारांची गुंडगिरी एवढी वाढली की त्यांनी एकाच कुटुंबातील दोन भावांना संपवून या दोन्ही भावांचे परिवार उद्ध्वस्त केले. त्यामुळे नागरिकांमधील असंतोषाचा भडका उडाला. एकीकडे मृताचे मोजके नातेवाईक आणि समतानगरातील काही नागरिक मेयोत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले..मारेकऱ्यांना फाशी द्यासंतप्त नागरिकांनी दुपारी ३.३० च्या सुमारास इमरत आणि पूरणलाल या दोन भावांची अंत्ययात्रा काढून जरीपटका ठाण्यावर नेली. तेथे नागरिकांच्या भावनांचा भडका उडू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे पोलिसांनी मोठा ताफा जरीपटका ठाण्यात बोलवून घेतला. शीघ्र कृती दलाचे जवान, आजूबाजूच्या ठाण्यातील पोलीस आणि एसीपी नीलेश राऊत यांच्यासह गुन्हे शाखेचाही ताफा जरीपटका ठाण्यासमोर पोहचला. त्यांनी ठाण्यात अंत्ययात्रा जाऊ नये म्हणून रस्ता अडवला. शोकसंतप्त नागरिकांनी अंत्ययात्रा थांबवून राणा बंधूंच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी करतानाच पोलिसांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन अंत्ययात्रा घाटावर नेली. तेथे राणा बंधूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुहेरी हत्याकांडामुळे जरीपटक्यात प्रचंड तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 02:13 IST