सदनिकेची झडती : पोलिसांच्या हाती बरेच काही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात ड्रग स्मगलर आशी डे हिच्या सदनिकेच्या झडतीत पोलिसांच्या हाती इलेक्ट्रॉनिक तिजोरीसह बरेच काही लागल्याची माहिती आहे. दरम्यान, तिला २५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले. आशी गेल्या अनेक महिन्यांपासून अमली पदार्थाच्या गोरखधंद्यात सक्रिय आहे. प्रारंभी ती उत्तर नागपुरातून गांजा, चरस विकायची. नंतर तिने एमडीची विक्री सुरू केली. वेगवेगळ्या साथीदारांच्या माध्यमातून ती मुंबईहून एमडी आणि चरसची लाखोंची खेप बोलवत होती. सोमवारी तिच्यासाठी मुंबईहून सलमान खान नामक तस्कर १३ लाखांची एमडी आणि एक लाख रुपयाची चरस घेऊन आला. त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला रेल्वेस्थानकाच्या गेट बाहेर जेरबंद केले. चौकशीतून त्याचे आणि आशीचे लागेबांधे उघड झाले. पोलिसांनी तिचे लोकेशन शोधून तिच्या इंद्रप्रस्थनगरातील भाड्याच्या सदनिकेत शुक्रवारी छापा घातला. याच दरम्यान आशी गुन्हे शाखेच्या हाती लागली. पोलिसांनी तिच्या सदनिकेत ड्रग्ज, इलेक्ट्रॉनिक तिजोरी आणि बरेच काही जप्त केले. तिला आज पोलिसांनी न्यायालयात हजर करून तिचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला.
---
ठिकठिकाणच्या ड्रग्ज तस्करांच्या संबंधाचा खुलासा अपेक्षित
आशीला अटक झाल्यामुळे तिच्या मुंबईसह ठिकठिकाणच्या ड्रग्ज तस्करांच्या संबंधाचा खुलासा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.