लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या महूतील जन्मभूमी स्मारक सोसायटी बौद्धांच्या ताब्यातून हिसकावण्याचे षङ्यंत्र रचले जात आहे. या अंतर्गत शासनातर्फे सोसायटीत अवैधपणे सदस्यांची घुसखोरी करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामागे मध्यप्रदेशचे भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री महेंद्र बौध्द यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत केला.
२०१९ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीत २२ सदस्य होते. परंतु, १२ सदस्य शासनाच्या मदतीने सोसायटीत घुसविण्यात आले. आता ही संख्या ३४ आहे. सोसायटीच्या अध्यक्षस्थानी सोसायटीच्या घटनेप्रमाणे बौद्ध भिक्खू असतो. सोसायटी अध्यक्षांच्या मृत्यूनंतर हा प्रकार करण्यात आला. आधी १६ विरुद्ध सहा अशी सोसायटीची अवस्था होती. ७ डिसेंबरला अतिरिक्त १२ सदस्य घुसवून विरोधी गटाला १८ असे बहुमतात आणून ठेवले. यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे बौद्धगयेतील महाविहाराप्रमाणे महूतील जन्मस्थळही बौद्धांच्या ताब्यातून हिसकावण्याचे हे षङ्यंत्र आहे. इंदूरचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या नव्या निवडीला मान्यता दिली. त्यामुळे इतर सदस्यांनी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध धाव घेतली आहे. नवे सदस्य हे सोसायटीचे सदस्यही नाहीत. संस्थापक सदस्यांना बाहेर ठेवून हा प्रकार होत आहे. आतापर्यंत सोसायटीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप नव्हता. आता सोसायटीतील नव्या सदस्यांमुळे हा हस्तक्षेपही वाढण्याची भीती बौद्ध यांनी व्यक्त केली. १९७१ पासून आतापर्यंत सोसायटीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीवर सुरू होते. आता त्यात बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने तातडीने नव्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी बौद्ध यांनी केली आहे. पत्रपरिषदेत सोसाायटीचे संस्थापक सदस्य डी.जी.खेवले, अॅड. एम. एम. सावंग, तुलसी पगारे, भंते नागदिपंकर, प्रशांत सुखदेवे, मोहन माकोडे, सुधीर भगत, भंते चिंचाल मेत्तानंद, भंते थेरो ज्योती, प्रा.राहुल मून, चंद्रबोधी पाटील, जितेंद्र दभे आदी उपस्थित होते.