लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / यवतमाळ : पेट्रोलियम मंत्रालयाने परकीय चलन वाचविण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल कंपन्या दरवर्षी इथेनॉलचे प्रमाण वाढवीत आहेत. पूर्वी ५ टक्के असलेले इथेनॉल आता २० टक्क्यांवर पोहोचले आहे. परिणामी, जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंजीन बिघडण्यास सुरुवात झाली आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले, तर वाहन चालते. मात्र, इथेनॉलवर वाहन चालेल, अशी इंजीनची डिझाइन असणे आवश्यक आहे. सध्या बीएस ४ तंत्रज्ञानाचा वापर झालेली जुनी वाहने इथेनॉलचे अधिक प्रमाण सहन करू शकत नाहीत. यामुळे पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढताच ही वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. इथेनॉलच्या वापराने चारचाकी वाहनांमध्ये असलेले इंजेक्टर गंजण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून पेट्रोल किंचित घट्ट येते. यामुळे पेट्रोल पुढे सरकविण्याची जबाबदारी असलेले इंजेक्टर जाम होत असून, पेट्रोलचा सप्लाय कमी होतो. यामुळे चालू स्थितीत अनेक वेळा गाडी बंद पडते, तर गाडी सुरू होण्यासाठीही मोठा विलंब लागतो.
अपघाताचा धोकाइंजेक्टर जाम होत असल्याने वाहनाचे एक्सिलेटर वाढविल्यावरही वाहन गती पकडत नाही. उलट मध्येच पेट्रोलचा फ्लो कमी होतो. यामुळे गाडी ओव्हरटेक करताना असा प्रकार घडला, तर अपघाताचा धोका निर्माण होतो.
मेकॅनिक काय म्हणतात...इथेनॉलमुळे गाडीचा वेग कमी केला तरी गाडी वेगाने चालते. ब्लॉक पिस्टल आणि कार्बोरेटर पिस्टल खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे दुचाकी मेकॅनिक आशिक निर्बान यांनी सांगितले. बीएस ४ मॉडेलमध्ये हा प्रकार उदभवत आहे. बीएस ६ या मॉडेलमध्येही अशा तक्रारी येत आहेत. गाडी घरघर करण्याचे प्रमाण वाढल्याचे मेकॅनिक पवन सराफ म्हणाले.
असे वाढले इथेनॉलचे प्रमाणप्रारंभी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल होते. ते प्रमाण नंतर ८ टक्के झाले, त्यानंतर १० टक्के, १२ टक्के आणि आता ते थेट २० टक्के झाले आहे.
ग्राहकांकडून तक्रार नाही"पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्यामुळे दुचाकी किंवा चारचाकीच्या इंजीनमध्ये बिघाड होत असल्याची कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. दररोज शेकडो गाड्यांची सर्व्हिसिंग होते. ग्राहकांकडून नियमित फीडबॅक घेतले जातात, पण अशा आशयाच्या तक्रारी अद्यापतरी कुणी केलेली नाही."- अचल गांधी, व्यवस्थापकीय संचालक, ए. के. गांधी टीव्हीएस
"वाहनातील पेट्रोल काढल्यानंतर यात पेट्रोलवर पाण्यासारखा थर तरंगताना दिसतो. वाहन दुरुस्ती करताना हा प्रकार प्रामुख्याने दिसतो. हा प्रकार म्हणजेच इथेनॉल असावे, असा अंदाज आहे."- संजय गंपावार, बॉडी सॅफ मॅनेजर, नेक्सा कंपनी
"पूर्वी वाहन सुरू होत नाही अथवा गीअर पडत नाही, अशी एखादीच तक्रार येत होती. आता दर दिवसाला ८ ते १० वाहने अशा तक्रारींची येत आहेत. यात बॅटरी जात नाही तर इंजेक्टर खराब होत आहे. चार ते आठ इंजेक्टर बदलावे लागतात. एक इंजेक्टर १४०० रुपयांचे आहे."- दिनेश उजवने, मारुती शोरूम, कंपनी