मनसेचा इशारा : आरटीओंना निवेदननागपूर : शहरातील आॅटोरिक्षा मीटरने चालावेत याबद्दल वाद नाही. मात्र, मीटरमध्ये दुरुस्ती करण्यासाठी कॅलिबरेशनकरिता अव्वाच्यासव्वा दर आकारून गरीब आॅटोचालकांवर अन्याय केला जात आहे. शहरात कॅलिबरेशनसाठी केवळ तीन सेंटर असून, त्याकरिता ६०० रु पये दर आकारला जात आहे. हा अन्याय असून तो त्वरित थांबविण्यात यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत पवार यांनी दिला.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवार यांनी सांगितले की, शहरात आॅटोरिक्षा मीटरप्रमाणे चालाव्यात, याकरिता आरटीओने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आजवर अनेक आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली. तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दंड वसूलसुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक आॅटोरिक्षाचालकांनी मीटरचा पर्याय मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नव्या नियमांप्रमाणे किलोमीटरला १४ रु पये असा दर ठरविण्यात आला आहे. त्याकरिता मीटरमध्ये योग्य ते बदल करून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरात केवळ तीन कॅलिबरेशन सेंटर आहेत. शहरात जवळपास नऊ हजार आॅटोरिक्षा असून, आरटीओने १५ सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीपर्यंत कॅलिबरेशन करणे शक्य नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात यावी; तसेच सेंटरवर सुरू असलेली लूट बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याखेरीज मुंबई-पुण्यात प्रति किलोमीटरचे दर हे १७.५० रु पये असून, नागपुरात केवळ १४ रुपये इतकेच दर आहेत. येथेसुद्धा हे दर वाढविण्यात यावे. तसेच शहरातील अवैध वाहतुकीवर बंदी आणावी, स्टार बसमध्ये नियमापेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जात असताना त्वरित चालान करावे, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. शिष्टमंडळात अजय साखळे, प्रदीप वाटकर, गणपत हटवार, मनोहर खैरे, दिलीप आत्राम, विनोद खंडारे आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)
मीटरच्या नावाने आॅटोचालकांची लूट नको
By admin | Updated: September 10, 2014 00:48 IST