नागपूर : नाट्यप्रयोगांना गर्दी आवरता आवरेना आणि आयोजकांकडून कोरोना संदर्भातील कुठलेही नियम पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. नाट्यप्रयोगांना परवानगीच देऊ नका, अशा आशयाचे पत्र पोलिसांकडून संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांना दिले जात आहे.
अशाच आशयाचे पत्र चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस ठाण्याकडून चिमूरच्या तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
तहसिलदारांनी १ डिसेंबर रोजी मौजा खुटाळा येथे होणाऱ्या मोकळ्या जागेतील नाट्यप्रयोगाला परवानगी दिली आहे. मात्र, वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चिमूर पोलिसांनी या व इतर नाट्यप्रयोगांना दिलेली परवानगी परत घ्यावी आणि पुढे परवानगी देऊ नये अशा विनंतीचे पत्र तहसिलदारांना पाठविले आहे. प्रचंड गर्दी जमून प्रेक्षकांकडून व्यक्तिश: अंतर पाळण्याचे नियम जपण्याची शक्यता नसल्याचे कारण, या पत्रात सांगण्यात आले आहे. शिवाय शासनाकडून जारी झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा पूर्ण होणार नसल्याचेही कारण पुढे करण्यात आले आहे. यावरून, आयोजक व संबंधित नाट्यसंघांकडून कोरोना नियमाबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाचा पहिला बळी
झाडीपट्टी रंगभूमीचरील नाट्यप्रयोगांना सुरुवात झाल्याला इन-मिन दहा-पंधरा दिवस लोटले नाही तोच कोरोनाने झाडीपट्टी रंगभूमीवरील पहिला बळी घेतला आहे. रविवारी सकाळीच ब्रह्मपुरी कोविड सेंटरमध्ये एका कलावंताने अखेरचा श्वास घेतला. मात्र, नाट्यसंघांकडून अजूनही लपवाछपवीचे राजकारण खेळले जात आहे. बरेच कलाकार व निर्माते यांनी कोरोना संक्रमित असतानाही, त्याबाबत वाच्यता न करण्याचे फर्मान सोडण्यात आल्याचे सांगितले आहे.
कलावंतांची माघार
रविवारी कोरोनाने पहिला बळी घेतल्याची वार्ता पसरताच अनेक कलावंतांनी नाट्यप्रयोग करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळातील नश्चित झालेले प्रयोग रद्द करण्याची वेळ निर्मात्यांवर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
........