वर्षभरात शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींचे कर्ज : ८० टक्के लक्ष्यांक गाठण्यात यश नागपूर : २०१५-१६ वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून नागपूर विभागातील शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. विभागात कर्जवाटपाचे ठरविण्यात आलेल्या लक्ष्यांकापैकी ८० टक्के कर्जवाटप करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांकडे शेतकऱ्यांना झालेल्या पीककर्ज वाटपासंदर्भात विचारणा केली होती. २०१५-१६ मध्ये किती शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले, कुठल्या बँकांमार्फत किती कर्ज देण्यात आले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किती पीक कर्ज देता येते इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१५-१६ मध्ये नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांत ३ हजार ३३५ कोटी ४५ लाख इतक्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक ठेवण्यात आले होते. यापैकी २ हजार ६८७ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांची रक्कम कर्ज म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आली. एकूण लक्ष्यांकांपैकी ८०.५७ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या माध्यमातून हे कर्जवाटप झाले. नागपूर विभागात या तिन्ही प्रकारच्या बँका मिळून ४ लाख ७७ हजार ७४१ सदस्य आहेत. एकूण झालेल्या कर्जवाटपापैकी ठरविलेले लक्ष्यांक गाठण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सर्वात जास्त यश आले. या बँकांमार्फत ८३५ कोटी ५९ लाख ४८ हजार इतके कर्ज वाटण्यात आले व एकूण लक्षांकापैकी ९५.३८ टक्के रकमेचे वाटप झाले. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये हाच आकडा १ हजार ६७५ कोटी ६२ लाख (७५.४३ टक्के) व ग्रामीण बँकांत १७६ कोटी ८ लाख (७३.९१ टक्के) इतका होता.(प्रतिनिधी)यंदाच्या खरीपात ९३ टक्के लक्ष्यांक गाठण्यात यशदरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात एकूण लक्ष्यांकापैकी ९३.२२ टक्के रक्कमेचे वाटप करण्यात आले. २० सप्टेंबरपर्यंत नागपूर विभागात ४ लाख २२ हजार सभासदांना २ हजार ८३५ कोटी ६० लाख ६५ हजारांचे कर्जवाटप करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात लक्षांकाहून अधिक कर्जवाटपनागपूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील लक्ष्यांकाहून अधिक कर्जवाटप करण्यात आले. कर्जवाटपाचे लक्ष्य ७६८ कोटी १ लाख होते. प्रत्यक्षात ८८ हजार ६९४ सदस्यांना ८६१ कोटी ६० लाख ७२ हजारांचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ११२.१९ टक्के आहे.
कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँकांची आघाडी
By admin | Updated: November 7, 2016 02:49 IST