लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण विभागातर्फे मागील काही वर्षात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे किंवा त्या शाळेला लगतच्या शाळेमध्ये समायोजित करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आणखी १३ जि. प.च्या शाळांवर गंडांतर येऊ शकते. या शाळा बंद करून तेथील विद्यार्थी व शिक्षकांचे लगतच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचे शिक्षण विभागाने प्रस्तावित केले आहे.
जिल्ह्यात जि. प.च्या १५३५ शाळा आहेत. पूर्वी या शाळांची संख्या १५५१ इतकी होती. परंतु वर्ष २०१८ मध्ये पटसंख्येअभावी १६ शाळा बंद करून त्यांचे परिसरातील लगतच्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आले होते. आता पुन्हा अशाच कमी पटाच्या व एक किलोमीटरच्या परिसरात दोन शाळा असलेल्यांपैकी एक शाळा बंद करून त्या शाळेचे दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. अशा १३ शाळांची निवड करण्यात आली आहे.