लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीची नियुक्ती होऊन चोवीस तासदेखील उलटत नाही तो पक्षात नाराजीचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे. कार्यकारिणी निष्ठावंत सदस्यांना न पटणारी असून ज्या लोकांना शिवसैनिक ओळखत नाहीत व जे शिवसैनिकांना ओळखत नाहीत अशा लोकांना त्यात स्थान देण्यात आला असल्याचा आरोप करत पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे उपविभागप्रमुख योगेश न्यायखोर यांनी राजीनामा दिला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर नागपूरचे शहर संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. मात्र या कार्यकारिणीत अनेक आयारामांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळेच जुने शिवसैनिक नाराज झाले आहेत. स्थानिक नेते व शिवसैनिकांशी सल्लामसलत न करता प्रभागातदेखील ज्यांना कुणी ओळखत नाहीत अशा आयारामांना पक्षबांधणीची जबाबदारी दिली आहे. ही नवीन कार्यकारिणी आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना पटणारी नाही. त्यामुळेच उपविभागप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे न्यायखोर यांनी सांगितले आहे.