रेवराल : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अनेकांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यावर अद्याप काेणताही निर्णय घेण्यात न आल्याने निराधारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी राेशन मेश्राम यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांना दिलेल्या निवेदनात केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
समाजातील निराधारांना आधार मिळावा म्हणून शासनाच्यावतीने काही कल्याणकारी याेजना राबविल्या जात आहेत. या याेजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना प्रशासनाकडे अर्ज करावे लागतात. मागील आठ महिन्यांत माैदा तालुक्यातील शेकडाे लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, प्रशासनाने त्यावर अद्याप काेणताही निर्णय घेतला नाही किंवा ते अर्ज निकाली काढले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, याबाबत माहिती घेण्यासाठी तालुक्यातील निराधार, वृद्ध, अंध, दिव्यांग, रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिला चाैकशी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. त्यांचे अर्ज निकाली न काढल्याने त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्याने ते संकटात सापडले आहेत. त्यांची ही ससेहाेलपट थांबविण्यासाठी अर्ज १५ दिवसांत निकाली काढावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.