नागपूर: जिल्हा वार्षिक योजनेचा निधी टप्प्याटप्प्याने मंजूर केला जातो. यंदा मात्र एकाच टप्प्यात संपूर्ण निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.जिल्हा वार्षिक योजना मंजूर झाल्यानंतर शासनाकडून त्यासाठी टप्प्याटप्प्याने तरतूद केली जाते. अनेक वेळा हा निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. यंदा मात्र या प्रक्रियेला ब्रेक लावत सरसकट रकमेची एकाच झटक्यात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याचा फायदा या रक्कमेतून होणाऱ्या विकास कामांना होणार आहे. निधीसाठी कामे खोळंबून राहण्याची शक्यता कमी आहे. २०१५-१६ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना २९१ कोटी रुपयांची आहे. त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या निधीतून जलयुक्त शिवारसाठी ५२ कोटी रुपये वळते करण्यात आले आहे हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)आमदार निधीही एकाच टप्प्यातआमदार निधीची रक्कमही एकाच टप्प्प्यात मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक आमदारांना दोन कोटींचा विकास निधी मिळतो व त्यातून आमदारांनी सुचविलेली कामे केली जातात. मागील वर्षी निवडणुकीचे वर्ष असल्याने तत्कालीन सरकारने संपूर्ण निधी एकाच टप्प्यात मंजूरकेला होता. त्यानंतर यंदाही सलग दुसऱ्या वर्षी एकाच टप्प्यात सर्व निधी देण्यात आला आहे. निवडणुकीनंतर प्रत्येक आमदारांसाठी शासनाने ५० लाखाचा अतिरिक्त विकास निधी मंजूर केला होता. आता २०१५-१६ या वर्षासाठी दोन कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी प्रत्येक आमदाराला अडीच कोटींची कामे करता येणार आहे.
एकाच टप्प्यात मिळाला विकास निधी
By admin | Updated: May 3, 2015 02:03 IST