चंद्रशेखर बावनकुळे : बाबदेव परिसरात गाव संपर्क अभियाननागपूर : मौदा तालुक्यातील बाबदेव परिसरातील विविध गावांमधील प्रलंबित विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची ग्वाही आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.गाव संपर्क अभियानांतर्गत आ. बावनकुळे यांनी बाबदेव परिसरातील सिंगोरी, नरसाळा, कुंभापूर, बाबदेव, सावरगाव, चांदेमांगली, कोपरा, किरणापूर, नानादेवी, कुंभारी, इसापूर, रहाडी, डहाळी आदी गावांना भेटी देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आ. बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बाबदेव - कोपरा - चांदेमांगली - किरणापूर या मार्गासाठी २ कोटी ५० लाख रुपये तसेच पूरहानी योजनेंतर्गत नानादेवी - कोपरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी २४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. नानादेवी अॅप्रोच पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, कुंभापूर या पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी दोन कोटी ५० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या भागातील कालवे, लघुकालवे, पाटसऱ्या, वितरिका, लघु वितरिका यांची दैनावस्था झाली आहे. जलसुधार योजनेंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही काम केले नाही. अवकाळी पाऊस गारपिटीची नुकसानभरपाई अद्यापही बँक खात्यात जमा करण्यात आली नाही, असे आरोप ग्रामस्थांनी यावेळी केले. कालवे व पांदण रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था, स्वस्त धान्य वितरणात येणाऱ्या अडचणी, श्रावणबाळ व निराधार योजनांच्या मध्यमातून मिळणारे अनुदान, जीवनदायी योजना, अन्न सुरक्षा योजना, खते व बियाण्यांची टंचाई व दरवाढ, भारनियमन, गावठाण पट्टे वाटप, सिंचन, रस्ते, घरकूल आदी संदर्भात ग्रामस्थांनी आ. बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या. या सर्व समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांनी दिली. यावेळी हरीश जैन, नरेश मोटघरे, हेमराज सावरकर, श्याम सावरकर, एकनाथ मदनकर, बेनिराम तिघरे, सुनीता पाराशर, कल्पना सावरकर, मंदा पंचवटे, ईश्वर भागलकर, राजू ईखार, कवडू सराटकर, बबलू चौधरी, किशोर ढोले, वीरेंद्र तायतोडे, सचिन मोटघरे, मिलिंद सोनटक्के, जितेंद्र बेहरे, सुधाकर बाभरे, सूर्यभान शेंबे, संजय नारनवरे, संजय डोंगरे, चंक्रधर बावणे, नाना डहारे, संजय वासनिक, गजेंद्र वाघमारे, राजेंद्र सोनटक्के, अशोक ठाकरे, बंडू सोनवणे, बापूराव केवट, दिनेश भोले, अमोल राऊत, अनिल वानखेडे, भोजराज बेहर, अजय शेंडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्र्रलंबित विकास कामे मार्गी लावणार
By admin | Updated: July 22, 2014 00:54 IST