- गणेश हूड नागपूर - "विकसित भारत घडवायचा असेल, तर शेतकऱ्यांचा विकास अत्यावश्यक आहे," असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी नागपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. सुरेश भट सभागृहात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’चा शुभारंभ करताना त्यांनी “एक राष्ट्र, एक कृषी, एक संघ” या संकल्पनेची घोषणा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
शिवराज सिंह चौहान म्हणाले या अभियानाअंतर्गत २९ मे ते १२ जून दरम्यान देशभरातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्रे व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील.
जेव्हा जगातील तथाकथित देशांमध्ये अजून सूर्योदयही झाला नव्हता, तेव्हा आपल्या देशात वेदांची रचना झाली होती. एक गौरवशाली, समृद्ध व शक्तिशाली भारत घडवण्याचे काम सुरू आहे. आपल्याला आपल्या सैन्यावर अभिमान आहे. कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेची कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा आहे. माझ्यासाठी शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे .कृषी क्षेत्रात जे संशोधन होत आहे ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी अभियान राबविले जात आहे.
भट सभागृहात 'विकसित कृषी संकल्प अभियान' अंतर्गत विविध कृषी उत्पादनांवर आधारित प्रदर्शनीचे शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादनांचे निरीक्षण केले आणि माहिती घेतली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्य मंत्री आशीष जायसवाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशीष देशमुख, चरणसिंग ठाकूर, आसीएआरचे महासंचाक डॉ. एम.एल. जाट ,आयसीएआरचे उप महासंचालक राजबीर सिंह, कृषी विभागाचे प्रधान सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृ्षी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.