लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधा व आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बलस्थाने लक्षात घेता नागपूर हे एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला. आर यांनी केले.
शुक्रवारी उद्योगभवनात आयोजित एक दिवसीय एक्सपोर्टर्स कॉनक्लेव्हच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मिहानचे विकास आयुक्त डॉ. व्ही. सरमन, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सिल (वेद) या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार राव, विदर्भ इन्डस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, उद्योग सहसंचालक ए. पी. धर्माधिकारी, मिहानचे मुख्य व्यवस्थापक संतोष कुमार सिंग, उपस्थित होते.
नागपूर हे शहर भौगोलिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोयीचे आहे. येथे मिहान आणि इतर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने व उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण असल्याने निर्यातक्षम उत्पादकांना त्यांचा माल जगभर पाठविता येईल. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी आहे. त्यांनी गुंतवणूक करावी, असे जिल्हाधिकारी विमला आर. म्हणाल्या.
सहसंचालक धर्माधिकारी यांनी आत्मनिर्भर भारत व ग्लोबल टू लोकल साठी नव-उद्योजकांनी निर्यात प्रोत्साहन आराखड्यात त्यांच्या सूचना देण्याचे आवाहन केले.
शिवकुमार राव यांनी “पोन्टेशिअल फॉर एक्सपोर्टस फ्रॉम विदर्भा” या विषयावर प्रकाश टाकला. गेल्या काही वर्षात दळणवळणाच्या सोयीने जग हे एक खेडे झाले आहे. त्यामुळे इथल्या उत्पादकांनी त्यांचा माल व उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी निर्यात करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
निर्यातीच्या संधीवर सनदी लेखापाल वरुण विजयवर्गी, अपेडाच्या योजनावर पी. ए. बामणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्र शासानाच्या निर्देशानुसार जिल्ह्याचा निर्यात प्रोत्साहन आराखडा (एक्सपोर्ट प्रमोशन प्लॅन) तयार करण्याचे काम सुरू असून त्याचे सादरीकरण भारती यांनी केले.