नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आमदार मौनी असल्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. गेल्या २० वर्षात देशमुखांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केले, कोणते निर्णय घेतले याचा हिशेब आधी द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली असून मंत्रिपद व आमदारकी गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून देशमुख अशी आगपाखड करीत असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली आहे. भाजप- राष्ट्रवादीत जुंपल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करीत देशमुख यांच्या वक्तव्याचा जोरात समाचार घेतला आहे. भाजप सरकारच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याची घोषणा केली. २१५ कोटी रुपये वीजबिल माफ केले. उलट राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये घोटाळे केले. शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. विधानसभेतील पराभवाचा देशमुखांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळेच ते असे आरोप करीत सुटले आहेत. राष्ट्रवादीने त्यांची मानसिक तपासणी करावी, खर्च भाजप देईल, अशी बोचरी टीकाही खोपडे यांनी केली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनीही देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कमी काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला. जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी योजना आखली. विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विहिरींवर पंप देण्याची योजना, सौरपंपाची योजना आणली. उलट अनिल देशमुख यांनी गेल्या २० वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधी जनता दरबार घेतला नाही. देशमुख यांनी केलेल्या ‘भाजपच्या आमदारांच्या चपलांचे हार घालू’ या वक्तव्यामुळे जिल्हा भाजपचे कार्यकर्ते संतापले असून अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशा इशाराही डॉ. पोतदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
देशमुखांची टीका भाजपच्या जिव्हारी
By admin | Updated: March 11, 2015 02:12 IST