सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी लांब व अतिलांब धाग्याच्या कापूस उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यामुळे उच्च दर्जाचा कापड तयार करणाऱ्या कापड उद्याेगांना लांब व अतिलांब धाग्याचा कापूस आयात करावा लागणार आहे. १० टक्के आयात करामुळे आयातीत कापूस व त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या निर्यातक्षम कापडाचे दर वाढणार आहे. त्यामुळे जागतिक बाजारात भारतीय उच्च दर्जाच्या कापडाचे अवमूल्यन हाेणार असल्याचे वस्त्राेद्याेगातील तज्ज्ञांनी सांगितले.
अमेरिकेतील पिमा, दक्षिण आफ्रिकेतील गिझा व इजिप्तमधील सुविन या जातीचा कापूस अतिलांब धाग्याचा व उच्च दर्जाचा असल्याने उच्च दर्जाचे कापड तयार करण्यासाठी या कापसाची जगात माेठी मागणी आहे. भारतात डीसीएच-३२ व वरलक्ष्मी या लांब धाग्याच्या जातीच्या कापसाचे उत्पादन कमी हाेत असल्याने त्याचे लागवड क्षेत्रही कमी हाेत आहे. भारतीय कापड उद्याेग निर्यातक्षम कापड उत्पादनासाठी दरवर्षी ८ ते १० लाख रुईच्या गाठींची आयात करायचे. यावर्षी लांब व अतिलांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन कमी झाल्याने भारतीय कापड उद्याेगाला १५ ते १८ लाख गाठींची आयात करावी लागणार आहे.
कापसावरील १० टक्के आयात करामुळे सूत व त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कापडाचीही किंमत किमान १० टक्क्यांनी वाढणार आहे. या वाढीव किमतीचा जागतिक बाजारातील भारतीय कापडाच्या विक्रीवर परिणाम हाेणार असल्याची माहिती वस्त्र उद्याेगातील सुभाष आकाेळे यांच्यासह तज्ज्ञांनी दिली असून, याला जिनिंग प्रेसिंग मालकांनीही दुजाेरा दिला आहे. जागतिक बाजारात इतर देशातील कापडाचे दर जवळपास सारखे राहत असल्याने तुलनेत भारतीय कापडाची किंमत वाढणार आहे. याचा भारतीय कापड उद्याेगावर विपरीत परिणाम हाेणार असल्याचेही तसेच आयात कर हा उपाय नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
...
जागतिक बाजारातील भारताचा वाटा
जागतिक कापसाच्या (रुई) बाजारात भारताचा वाटा २२ ते २४ टक्के असून, कापड बाजारात भारताचा वाटा हा १५ ते १७ टक्के आहे. इतर देशांमध्ये रुईचे सरासरी प्रति हेक्टरी १,६०० ते १,७०० किलाे उत्पादन हाेत असून, भारतात रुईचे सरासरी प्रति हेक्टरी ७०० ते ८०० किलाे आहे. सरकारने भारतीय शेतकऱ्यांना लांब व अतिलांब धाग्याच्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित (जीएम किंवा जेनेरिक सीड) कपाशीचे बियाणे उपलब्ध करून दिल्यास आपल्याला लांब व अतिलांब धाग्याच्या कापसाची आयात करावी लागणार नाही, अशी माहिती मधुसूदन हरणे, हिंगणघाट, विजय निवल यवतमाळ यांच्यासह इतर कापूस उत्पादकांनी दिली.
...
सूत व कापडाचे प्रकार
२७ ते २८ मिमी लांबीच्या कापसापासून १० व २० नंबरचे सूत तयार हाेत असून, त्यापासून चादर, सतरंजी टाॅवेलचे जाड कापड तयार हाेते. २७ ते २८ मिमी लांबीच्या कापसापासून १० व २० नंबर (काऊंट)चे सूत तयार हाेत असून, त्यापासून मध्यम जाड कापड, २९ ते ३० मिमी लांब कापसापासून २४ व ४० नंबरचे सूत व त्यापासून शर्टिंगचे कापड, ३० ते ३१ मिमी लांब कापसापासून ४० व ६० नंबरचे सूत व त्यापासून साडी, धाेतर, ३२ ते ३४ मिमी लांब कापसापासून ८० व १०० नंबरचे सूत व त्यापासून उच्च दर्जाचे कापड तयार केले जाते.
..
शासनाने कापसावर लावलेला १० टक्के आयात कर ही कापूस व कापड उद्याेगाच्या पुनरुज्जीवनासाठी अंतिम उपाययाेजना नाही. यासाठी शासनाने इतर महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे व त्यासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरविणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती तयार करणे गरजेचे आहे. भारतातून दरवर्षी ४५ ते ५० लाख रुईच्या गाठींची निर्यात केली जाते. निर्यातदारांना ‘जीएसटी’चा परतावा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे करप्रणाली व निर्यात धाेरणात सुसूत्रता असावी.
- सुभाष आकाेळे, मालक,
रत्नाकर टेक्सटाईल इंडस्ट्रीज, इचलकरंजी.