दहा शाळांमध्ये डासांच्या अळ्या : महापालिकेची शाळा तपासणी मोहीमनागपूर : पालकांनो सावधान, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केलेल्या शाळांच्या पाहणीत तब्बल दहा शाळांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या आहेत. शाळांमध्ये डेंग्यूची उत्पत्ती ही बंद कुलर्स आणि उघड्या पाण्याच्या टाकीतून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली असताना शाळा प्रशासन या विषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. लोकमतच्या चमूने १ सप्टेंबर रोजी शहरातील दहा शाळांचे निरीक्षण केले. यातील बहुसंख्य शाळांमध्ये पाण्याचे डबके, उघडे टाके, बंद कुलर्स हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण ठरत असल्याचे ‘डेंग्यूचे विघ्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने खासगीसह मनपाच्या शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत २०६ शाळांची तपासणी करण्यात आली.यात दहा शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. डेंग्यूचे डास दिवसा चावतात आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहतात. यामुळे महापालिका प्रशासनाने याला गंभीरतेने घेतले आहे. ‘डेंग्यू’ संदर्भात शाळांमध्ये जाऊन जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे, परंतु शाळांमध्ये डासांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना होतच नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)या आहेत शाळामनपाच्या चमूला धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या के.व्ही.शाळा, विश्वविद्या विहार आणि मॉडर्न स्कूल आदी शाळांच्या कुलर्समध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या रामदासपेठ येथील सोमलवार शाळेतील एका भांड्यात, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालय व मिलिंद विद्यालयातील बंद कुलर्समध्ये आणि स्वच्छता गृहातील पाण्याच्या टाक्यात, नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या भारतीय विद्या भवनमध्ये कुलर्समध्ये विवेकानंद विद्यालयात सिमेंटच्या टाक्यात, गांधीनगर झोनमधील मनपाच्या सानेगुरुजी शाळेत आणि बाभुळबन येथील मनपाच्या शाळेतील पाण्याच्या टाक्यात डेंग्यू डासाच्या अळ्या मिळाल्या.
शाळांना डेंग्यूचा डंख
By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST