नागपूर : प्रवीण दटके यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला शिस्त लागेल. आरोग्यासह मूलभूत सुविधात सुधारणा होतील, अशी अपेक्षा होती. परंतु शहरातील नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. घराघरांत रुग्ण आढळत असल्याने नागरिकात डेंग्यूची दहशत पसरली आहे. असे असतानाही डेंग्यू कमी झाल्याचा दावा करीत पदाधिकारी व अधिकारी आपली पाठ थोपटून घेत आहेत. महापौर हेच डेंग्यू नियंत्रण संदर्भात गंभीर नसतील तर नागरिकांनी अपेक्षा कुणाकडून बाळगावी? मनपाचा आरोग्य विभाग कामाला कसा लागणार. प्रशासन व पदाधिकारी गंभीर नसल्याने उपराजधानीत वेगाने पसरत असलेल्या डेंग्यू आजाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान शहरात डेंग्यू आजाराची सध्या काय स्थिती आहे आणि मनपाने त्याच्या नियंत्रणासाठी कुठले प्रभावी पाऊल उचलले आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मनपाला केली आहे. मनपाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याकडे एका जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. यावर सारवासारव म्हणून महापौर व आरोग्य समितीचे सभापती बैठकातून डेंग्यू नियंत्रणाचा आढावा घेत आहेत. परंतु दोघात समन्वय नाही. महापौरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यूमुळे ७ जणांचे बळी गेले आहेत. दुसरीकडे सभापती रमेश सिंगारे ४ जणांचाच मृत्यू झाल्याचा दावा करीत आहेत. यातून डेंग्यू संदर्भात पदाधिकारी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देत असताना भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात मात्र सर्वत्र अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. डेंग्यू नियंत्रणसंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डेंग्यू नियंत्रणात असल्याचा दावा पदाधिकारी व प्रशासन करीत असले तरीही प्रत्यक्षात कार्यवाही संथ आहे. आरोग्य विभागाचे पथक वस्त्यात तपासणी न करताच कागदोपत्री अहवाल तयार करीत असल्याने डेंग्यूचे थैमान थांबता थांबत नसल्याचे भयाण चित्र आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही दटके मात्र सत्कार समारंभात व्यस्त असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
उपराजधानीला डेंग्यूचा डंख
By admin | Updated: November 8, 2014 02:45 IST