नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये ऑनलाईन सुनावणीसह फिजिकल सुनावणीही सुरू ठेवण्याची मागणी जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. संघटनेने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांना निवेदन सादर केले.
संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा व सचिव अॅड. नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये सध्या केवळ ऑनलाईन सुनावणी सुरू असल्यामुळे वकिलांना तांत्रिक व अन्य विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याकरिता, न्यायालयीन कामकाजाकरिता मिश्र पद्धतीचा उपयोग केला जावा असे वकिलांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयात केवळ वकिलांना प्रवेश देऊन फिजिकल सुनावणी घेतली जावी. तसेच, ऑनलाईन सुनावणीचा पर्यायही उपलब्ध ठेवावा व याकरिता जिल्हा न्यायालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.