नागपूर : व्यवसाय आणि रोजगारानिमित्त विदर्भातून आलेला बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर नागपुरात आहे. मात्र, या उत्सवप्रिय समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आणि विद्यार्थिनी व महिलांच्या निवासासाठी वसतिगृह नाही. शासनाने यासाठी भूखंड द्यावा, अशी मागणी सतीमाता जानकीमाता बंजारा समाज महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नागपूर शहरामध्ये जवळपास ५० हजारांवर बंजारा समाजबांधव वास्तव्यास आहेत. हा समाज मुख्यत: शेतीवर उदरनिर्वाह करणारा असला तरी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात स्थिरावला आहे. तीज, होळी, दिवाळी यासारखे अनेक सण आणि उत्सव हा समाज सामूहिकपणे आणि परंपरेने एकत्र येऊन साजरे करीत असतात. मात्र, नागपुरात अशा पारंपरिक उत्सवासाठी समाजाचे सभागृह नाही. समाजातील अनेक तरुणी शिक्षणासाठी तसेच नोकरीच्या निमित्ताने नागपुरात आहेत. त्यांच्या निवासासाठी वसतिगृह नाही. त्यामुळे शासनाने भूखंड दिल्यास समाजातील महिलांची सुविधा होईल, अशी अपेक्षा सतीमाता जानकीमाता बंजारा समाज महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष जयश्री राठोड, सचिव नलिनी पवार, सदस्य राजश्री राठोड आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
...
वसंतराव नाईकांच्या पुतळ्यासमोर शिडी लावा
विधान भवन परिसरात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे. जयंती, पुण्यतिथीला अभिवादनासाठी समाजबांधव तिथे जातात. मात्र, पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी शिडीची व्यवस्था नाही. ही अडचण लक्षात घेऊन तिथे शिडी उभारली जावी, अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
...