बी.कॉम नंतर आता बी.ए.चा गोंधळ : निकाल कमी लागण्याचे कारण काय?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ प्रथम वर्षाचा निकाल अवघा १८ टक्के लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. असे असतानाच ‘बीए’ प्रथम वर्ष व ‘बीकॉम’ द्वितीय वर्षाचे निकालदेखील अवघे २० टक्क्यांच्या जवळपासच लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, निकाल कमी लागण्याचे कारण काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. शनिवारी एकाच दिवशी जवळपास ९० निकाल जाहीर झाले. यात ‘बीए’ प्रथम वर्ष व ‘बीकॉम’ द्वितीय वर्षाच्या निकालांचादेखील समावेश आहे. परंतु संकेतस्थळावर निकाल पाहताच अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. ज्या विषयात उत्तीर्ण होण्याची पूर्ण खात्री होती, त्यात अनुत्तीर्ण झाले असल्याची तक्रार अनेकांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही अभ्यासक्रमांचा निकाल २० टक्क्यांच्या आसपासच लागला आहे. निकाल कमी लागण्याची नेमके कारण काय यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, शनिवारी जाहीर केलेल्या अनेक निकालांना ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहे. यामागील कारणे स्पष्ट करण्यात आलेली नाही. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे निकाल थांबविण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)संकेतस्थळावर लपविली टक्केवारीआश्चर्याची बाब म्हणजे निकाल कमी लागला आहे हे कळताच विद्यार्थी संतप्त होतील हे ओळखून असलेल्या विद्यापीठाने संकेतस्थळावर निकालांची टक्केवारीच जाहीर केलेली नाही. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या निकालासोबत टक्केवारीदेखील दर्शवली जाते. परंतु या निकालांमध्ये तांत्रिक अडचणींचे कारण देऊन ही टक्केवारी दर्शविण्यात आलेली नाही. आॅनलाईन गुणपत्रिका व निकाल मात्र उपलब्ध आहेत.
निकाल घसरतोय ...
By admin | Updated: August 10, 2015 02:37 IST