हायकोर्टात अहवाल : ३ लाख २३ हजाराची गरजनागपूर : अजब बंगला नावाने प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालयातील नवनिर्मित नागपूर हेरिटेज गॅलरीचे उद्घाटन विद्युतीकरणासाठी निधी मिळाला नसल्यामुळे रखडले आहे. विद्युतीकरणासाठी ३ लाख २३ हजार १७२ रुपयांची गरज आहे.संबंधित प्रकरणातील न्यायालयीन मित्र अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मध्यवर्ती संग्रहालयाच्या सध्यास्थितीचा अहवाल सादर करून या बाबीकडे लक्ष वेधले. संग्रहालयाच्या अभिरक्षकांनी सर्वप्रथम ३० जून २०१४ रोजी शासनाला पत्र लिहून निधीची मागणी केली होती. यानंतर त्यांनी १६ आॅक्टोबर व १५ नोव्हेंबर रोजी स्मरणपत्रे पाठविली. परंतु, हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. शासनाने यावर काहीच उत्तर दिलेले नाही. याशिवाय, संग्रहालयाच्या सहायक अभिरक्षकाचे पद १ आॅक्टोबर २०११ पासून रिक्त आहे. चौकीदारांच्या दोन, तर टेक्निकल असिस्टन्ट (लेबॉरेटरी)च्या एका पदावर अद्याप नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजब बंगल्यातील विविध समस्यांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर २३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)पोलीस आयुक्त प्रतिवादीसंग्रहालयात सोने-चांदीचे अनेक मौल्यवान दागिने व पुरातन वस्तू आहेत. अशा परिस्थितीत चौकीदार किंवा सुरक्षा रक्षकांकडे शस्त्रे असणे आवश्यक आहे. स्थानिक पोलिसांनी सुरक्षा पुरविल्यास ही समस्या सुटू शकते. त्यासाठी याचिकेत पोलीस आयुक्तांना प्रतिवादी करण्याची मान्यता न्यायालयाने दिली आहे. पोलीस आयुक्तांना यासंदर्भात नोटीस बजाण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नागपूर हेरिटेज गॅलरीला विलंब
By admin | Updated: December 21, 2014 00:10 IST