गैरप्रकार : कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण नागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांनी अखेर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर (एसीबी) शरणागती पत्करली. एसीबीचे अधिकारी त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करून त्यांचा पीसीआर मागणार आहे. सोसायटीच्या माध्यमातून डॉ. दीपक बजाज यांनी अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेतल्याची आणि मोठी मालमत्ता जमविल्याची तक्रार एसीबीला मिळाली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात एसीबीच्या पथकाने डॉ. बजाज यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली. डॉ. बजाज यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात धाड टाकून झडती घेण्यात आली. त्यात एसीबीच्या पथकाला ३२ लाखांची रोकड, ४८८ ग्रॅम सोने आणि ५.८५ किलो चांदी सापडली, याशिवाय नऊ वाहने आढळली. त्यात एक ५५ लाखांची आलिशान कारही आहे. घरातील फर्निचर तसेच अन्य संपत्तीचा हिशेब केल्यानंतर ही मालमत्ता पावणेतीन कोटींच्या घरात गेली. दरम्यान, बजाज यांनी गैरव्यवहाराशी संबंधित दस्तऐवज सिंधू एज्युकेशन सोसायटी परिसर, जरीपटका येथील निवासस्थान प्रिन्सिपल बंगलो, महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, के.सी. बजाज मार्ग जरीपटका येथे लपवून ठेवल्याचा संशय होता. त्यामुळे पुन्हा पाच ठिकाणी एसीबीच्या वेगवेगळ्या पथकाने झडती घेतली. एका लिपिकाकडेही झाडाझडती घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणच्या चौकशीत एसीबीला गैरव्यवहाराचे मोठे घबाड मिळत गेले. प्रदीर्घ चौकशीतून बजाज यांच्या गैरव्यवहाराचे अनेक पुरावे एसीबीच्या हाती लागले.त्यामुळे २६ सप्टेंबरला जरीपटका पोलीस ठाण्यात डॉ. बजाज तसेच त्यांच्या पत्नीविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
दीपक बजाजने पत्करली अखेर शरणागती
By admin | Updated: November 13, 2015 02:43 IST