लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.सीताबर्डीतील लोखंडी पुलाजवळ जसपाल सिंग यांच्या मालकीचे खालसा हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसापासून हे हॉटेल बंद आहे. मात्र, या हॉटेलमध्ये काम करणारे तीन तरुण तेथेच राहत होते. गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने हॉटेलच्या आजूबाजूला असलेल्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डीचे पोलीस पथक हॉटेल समोर पोहोचले. मालकालाही बोलवून घेण्यात आले. त्यानंतर हॉटेलचे दार उघडून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केल्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला विचारपूस सुरु केली. तीन कर्मचाऱ्यां पैकी मृतदेह कुणाचा, असा प्रश्न उपस्थित झाला. हॉटेलमध्ये राहणाऱ्यापैकी दोघे कुठे आणि कधी निघून गेले, हे स्पष्ट झाले नाही. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला, तेही उघड झाले नाही. त्याच्या अंगावर चादर झाकून होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. तो आजारी असावा आणि खाणेपिणे मिळाले नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.न कळवता ते दोघे कुठे गेले?मृतासोबतची दोन मुले एकट्याला सोडून हॉटेल मालकाला न कळवता कधी आणि कुठे निघून गेली, ते स्पष्ट झालेले नाही. मृतदेह कुजला असल्यामुळे वैद्यकीय अहवालानंतरच तपासला वेग देता येईल, असे सीताबर्डी पोलीस म्हणाले.
नागपुरात हॉटेलमध्ये कुजलेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 22:48 IST
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.
नागपुरात हॉटेलमध्ये कुजलेला मृतदेह आढळला
ठळक मुद्देमृत हॉटेलमध्येच काम करणारा : उलटसुलट चर्चा, सीताबर्डी पोलिसांचा तपास सुरु