नागपूर : अपहरण आणि हत्याकांडाची माहिती दडवून आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली लकडगंज पोलिसांनी युग हत्याकांडाचा सूत्रधार राजेश दवारे याच्या लहान भावाला अटक केली. त्याची नंतर बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. १० कोटींच्या खंडणीसाठी आरोपी राजेश धन्नालाल दवारे याने अरविंद सिंग या साथीदाराच्या मदतीने डॉ. मुकेश चांडक यांच्या युग (वय ८) नामक मुलाचे १ सप्टेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास अपहरण केले. त्याची गळा दाबून हत्या केली. अपहरण केल्यानंतर आरोपी राजेश आणि अरविंद युगला राजेशच्या घरी घेऊन गेले. तेथे त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून आणि हातपाय बांधून घरातील दिवाणमध्ये डांबून ठेवण्याचा आरोपीचा कट होता. मात्र, राजेशच्या काकूने युग कोण आहे, कशाला घरी आणले, अशी विचारणा केली. त्यामुळे आरोपी राजेशने त्याला घरी डांबून ठेवण्याचा कट बदलवला. तो त्याला लोणखैरी मार्गावर घेऊन गेला. युगची हत्या केल्यानंतर आरोपींनी बाबुळखेड्याजळच्या नाल्यात युगचा मृतदेह फेकून दिला. नंतर आरोपी राजेश तसेच अरविंद पुन्हा राजेशच्या घरी परतले. हा सर्व घटनाक्रम राजेशच्या भावाला (वय १७) माहीत होता. त्यानेच चिकटपट्टी आणि दोरी नंतर लवपून ठेवली. परंतु, पोलिसांना माहिती देण्यासाठी तो पुढे आला नाही. अर्थात् पुरावा नष्ट कारण्यासाठी त्याने अपहरण आणि हत्याकांडातील आरोपींना मदत केली. मुख्य आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोघांच्याही चौकशीतून हे सर्व रेकॉर्डवर आले. त्यामुळे लकडगंजचे ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज या प्रकरणात राजेशच्या भावाला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यासाठी आणलेली चिकटपट्टी आणि दोरी जप्त केली. तो बारावीचा विद्यार्थी आहे. १७ वर्षांचा (अल्पवयीन) असल्यामुळे पोलिसांनी नंतर त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली. (प्रतिनिधी)
दवारेच्या भावाला अटक
By admin | Updated: September 19, 2014 00:58 IST