रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी चौक : रस्त्यावर लोंबकळत आहेत विद्युत तारानागपूर : रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी चौकाकडे जाणाऱ्या दक्षिण अंबाझरी मार्गावरील पथदिव्यांच्या तारा लोंबकळत असल्याने कधीही मोठा धोका होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दुभाजक खोदून नवीन तारा टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु संथगतीच्या कामामुळे तसेच अनेक जिवंत तारा उघड्यावर आल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहन चालविणे किंवा दुभाजक ओलांडणे धोकादायक ठरू शकते.या दक्षिण अंबाझरी मार्गावर आयटीआय, बी.आर.ए. मुंडले हायस्कूल, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालकाचे कार्यालय, अंध विद्यालय व इतरही महत्त्वाच्या संस्था आहेत. यामुळे पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वर्दळ असते. पहाटे व सायंकाळी या मार्गावर ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. असे असताना मनपाच्या धंतोली झोनचे या मार्गाकडे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येते. रस्त्याचे डांबरीकरण जागोजागी उखडलेले आहे. रस्त्याच्या दुभाजकाचे खोदकाम करून पथदिव्यांसाठी नवीन विद्युत लाईन टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु संथगतीच्या कामामुळे रस्त्यावर हिरव्या रंगाच्या तारा पडून असतात. ज्या पथदिव्याची जोडणी केली जात आहे त्याच्या तर जिवंत तारा बाहेर आल्या आहेत. यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा कधीही याला स्पर्श होऊन धोका होऊ शकतो. परिसरातील नागरिकांच्या मते, या तारांमधून अनेक वेळा ठिणग्या निघतात. अशा वेळी रस्त्यावरून चालणेही धोकादायक होऊ शकते. मनपाच्या धंतोली झोनच्या विद्युत विभागाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तत्काळ उपाययोजना केली जाईलदक्षिण अंबाझरी मार्गाच्या दुभाजकावरील पथदिव्यांसाठी नवी विद्युत लाईन टाकण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. आणखी १५ दिवसांचे काम शिल्लक आहे. परंतु विद्युत तारा बाहेर आल्या असतील तर त्यावर तत्काळ उपाययोजना केली जाईल. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारीच ते काम हाती घेतले जाईल.-विजय मरसकोल्हेकनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग धंतोली झोन
दक्षिण अंबाझरी मार्ग धोकादायक
By admin | Updated: July 7, 2015 02:24 IST