लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधीच कोरोनामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले. अनेकांचा रोजगार गेला. शासनाने मदतीचा हात दिला. गेल्या नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य वितरित झाले. परंतु आता ही योजनाच बंद झाली. यातही गेल्या दोन महिन्यांपासून रेशनमधून डाळही गायब झाली आहे. दोन महिन्यांपासून डाळीचे वितरणच बंद आहे. यासंदर्भात दुकानदार प्रशासनाकडे तर प्रशासन दुकानदारांकडे बोट दाखवित गरिबांची बोळवण केली जात आहे.
कोराेनानंतरच आता सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असले तरी अनेक गरिबांचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यासमोर अजूनही मोठे संकट आहे. यातच रेशन दुकानातून देण्यात येणारे मोफत धान्यही आता बंद झाले आहे. मोफत धान्य देणे बंद झाले असले तरी नियमित मिळणारी डाळही गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेली नाही. लोक रेशन दुकानदारांना याबाबत विचारणा करतात तेव्हा रेशन दुकानदार सरकारकडूनच डाळ मिळालेली नाही, असे सांगतात. तर पुरवठा
विभागाला विचारणा केली तर डाळीचे वितरण झाले. अनेक दुकानदारांनी उचल केली नसल्याचे कारण सांगितले जाते. अशा परिस्थितीत नेमकी चूक कुणाची असा प्रश्न निर्माण झाला असून गरिबांना मात्र डाळीपासून वंचित राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.