कच्चे तेल झाले शून्य डॉलर प्रति बॅरल; जगभर खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:16 PM2020-04-21T17:16:47+5:302020-04-21T17:17:11+5:30

न्यूयॉर्कच्या मर्कन्टाईल एक्स्चेंज (नायमेक्स) या बाजारामध्ये अमेरिकन कच्च्या तेलाचा भाव उणे ३७ डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे.

Crude oil became zero dollars per barrel | कच्चे तेल झाले शून्य डॉलर प्रति बॅरल; जगभर खळबळ

कच्चे तेल झाले शून्य डॉलर प्रति बॅरल; जगभर खळबळ

Next


सोपान पांढरीपांडे
नागपूर : न्यूयॉर्कच्या मर्कन्टाईल एक्स्चेंज (नायमेक्स) या बाजारामध्ये अमेरिकन कच्च्या तेलाचा भाव उणे ३७ डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे. याचे कारण इतिहासात कच्चे तेल ११ डॉलर प्रति बॅरलपेक्षा कधीही घसरलेले नाही. १९९९ साली कच्चे तेल ११ डॉलर प्रति बॅरल झाले होते.

हे कसे घडले?
जगात दोन प्रकारचे कच्चे तेल शुद्धीकरणासाठी वापरले जाते. ब्रेंट कृ्रूड व नायमेक्स क्रूड (याला अमेरिकन क्रूडही म्हणतात व त्यात वेस्ट टेक्सॉस इंटरमिजीएट, शेल गॅस व वेस्ट कॅनडीयन सिलेक्ट) यांचा समावेश होतो. ब्रेंट क्रूडचा वायदा बाजार लंडन मेटल एक्स्चेंज तर नायमेक्सचा वायदे बाजार न्यूयॉर्कमध्ये आहे. ब्रेंट क्रूडपेक्षा नायमेक्सचा भाव अंदाजे ९० टक्के असतो.

डिसेंबर २०१९ मध्ये ब्रेंट क्रूड ५० ते ५५ डॉलर प्रति बॅरल होते. त्याच महिन्यात चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला व नंतर ती साथ देशभर पसरली. ती रोखण्यासाठी ९० टक्के देशांमध्ये सध्या लॉकडाऊन झाले आहे. दुचाकी, चारचाकी, ट्रक, बसेस, रेल्वे, विमाने, जहाजे बंद आहेत. परिणामी कच्च्या तेलाची मागणी व खप ३० ते ३५ टक्क्याने घटला आहे.

कच्च्या तेलाची साठवण क्षमता
जगभर दररोज अंदाजे ११० लक्ष बॅरल कच्चे तेल शुद्धीकरणासाठी वापरले जाते. सध्या ही मागणी ७० लक्ष बॅरलवर आली आहे. जगभर कच्च्या तेलाची साठवण क्षमता साधारणत: ४० ते ४५ दिवसांची म्हणजे ४५०० लक्ष बॅरल एवढी आहे. यात जमीन, समुद्रात उभे केलेले अजस्त्र टँक्स व क्रूडवाहू जहाजांचा (क्रूड कॅरियर्स) समावेश आहे. सध्या कच्च्या तेलाची मागणी घटल्याने ही साठवण क्षमता पूर्ण भरली आहे व कच्चे तेल साठवण्याची क्षमताच शिल्लक नाही.

कच्च्या तेलाचा वापर कसा होतो?
कच्च्या तेलाच्या किमती रोज कमी-जास्त होत असतात. जगभराच्या अनेक सटोडियांसाठी कच्चे तेल हे पैसा कमविण्याचे साधन आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे व्यवहार वायदे बाजारात होतात. यात भविष्यातील भावाचा अंदाज घेऊन सौदे केले जातात व पूर्ण केले जातात. हे सौदे कोट्यवधी बॅरल्स व कोट्यवधी डॉलर्सचे असतात. त्यात सटोरियचे श्रीमंत होतात तसे भीकेलाही लागतात.

मे महिन्याचे सौदे
डिसेंबरपासून कच्च्या तेलाच्या किमती ५५ डॉलरवरून ३० ते ३५ डॉलरपर्यंत आल्या होत्या. त्यामुळे भाव कमी होण्याच्या आशेने सटोरियांनी मे महिन्यात नायमेक्स कच्चे तेल २५ ते ३५ डॉलर होईल, असे सौदे केले होते. सौदे पूर्ण करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल म्हणजे आजची होती.
काल सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा किमती वाढण्याची कुठलीही शक्यता नव्हती. शिवाय साठवणूक क्षमता पूर्णत: संपलेली होती. त्यामुळे सौदा पूर्ण करून तेलाची डिलेव्हरी घेतली तर ते साठवायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे सटोडियांनी डिलेव्हरी घेण्याऐवजी भावातील फरक (डिफरन्स) स्वीकारून सौदे पूर्ण करायला सुरुवात केली. याचा परिणाम होऊन कच्च्या तेलाचे भाव गडगडले व एकाचवेळी नायमेक्सचे भाव एक डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले व शेवटी डिफरन्स नफा देऊनपण सौदा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडूनच पैसे घ्या, असे म्हणायची वेळ सटोडियांवर आली. त्यामुळे नायमेक्स बाजारात काल कच्च्या तेलाचे भाव उणे ३७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरले. अर्थात हा भाव फार कमी वेळ राहिला व भाव बंद झाला तेव्हा भाव २० डॉलर बॅरल झाला होता. ही घडामोड फक्त नायमेक्स बाजारात घडली. ब्रेंट क्रूडवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ब्रेंटचे भाव २५ ते २६ डॉलर प्रति बॅरल होते.

परंतु या अभूतपूर्व घडामोडीमुळे ब्रेंट कू्रडचे भावही कमी होतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. जून्य महिन्याचे नायमेक्स कच्च्या तेलाचे सौदे २० डॉलर आणि जुलैचे सौदे २५ डॉलर प्रति बॅरलचे आधीचे झाले आहेत. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती पुढील तीन महिन्यात फारशा वाढणार नाहीत, असा अंदाज बांधायला हरकत नाही.

 

Web Title: Crude oil became zero dollars per barrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.