A crowd of fans to make to wish birthday of Nitin Gadkari in Nagpur | नितीन गडकरींचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी चाहत्यांची गर्दी
नितीन गडकरींचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी चाहत्यांची गर्दी

ठळक मुद्दे शुभेच्छांसाठी भक्ती निवासावर लागल्या रांगा   राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे  नागपूर लोकसभेतून निवडून आल्यानंतर त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देण्याच्या प्रतिक्षेत  होते. अशातच त्यांचा वाढदिवस आल्याने चाहत्यांना त्यांना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली.  सोमवारी सकाळापासून रामनगरातील त्यांच्या भक्ती निवासस्थानावर शुभेच्छांसाठी चाहत्यांची रांगच रांग लागली.  विशेष म्हणजे गडकरींनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी सर्व काम बाजूला सारून सकाळी ८ वाजतापासून चाहत्यांच्या भरभरून शुभेच्छा स्विकारल्या. 
नितीन गडकरी हे जाती धर्माच्या पलिकडे संबंध जपणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानावर सर्व जाती धर्मातील सामाजिक  संघटनांचे प्रतिनिधी,  विविध राजकीय पक्षांमध्ये त्यांचे संबंध असल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.  कुणी पुष्पगुच्छ, कुणी मोठमोठे हार, कुणी भेटवस्तू, कुणी मोठमोठ्या प्रतिमा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.  त्यांच्या चाहत्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांना मिठाई भेट देण्यात आली. एखाद्या मंदिरात विशिष्ट दिवसी जशी दर्शनाला गर्दी होते. तशीच गर्दी गडकरींच्या भक्तीनिवासावर झाली होती.  चाहत्यांच्या स्वागतासाठी भव्य मंडप टाकला होता.  बॅण्ड पथकांचे स्वर ‘हॅपी बर्थ डे टु नितीनजी’ असे गुंजत होते. फटाक्यांची आतिषबाजी होत होती. अशा वातावरणात गडकरी सर्वांच्या शुभेच्छा स्विकारीत होते. मोठ्यांकडून आशिर्वाद तर लहान्यांशी हस्तांदोलन करीत होते. 
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या नागपूरकर चाहत्यांबरोबरच, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आमदार, खासदार व मंत्र्यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यामध्ये राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  मंत्री  संभाजीराव निलंगेकर पाटील, पालकमंंत्री डॉ. रणजित पाटील,  राज्यमंत्री प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, महापौर नंदा जिचकार, आमदार व शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे,  आमदार सुधाकर देशमुख,  डॉ. मिलींद माने, प्रा. अनिल सोले, नागो गाणार, गिरीष व्यास, सुधीर पारवे, माजी खासदार हंसराज अहिर, माजी खासदार मधुकर कुकडे,  बहुजन रिपब्लिक्न एकता मंचच्या नेत्या व माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे,  मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.  

 पंतप्रधानांनी केले गडकरींना शुभेच्छांचे टिष्ट्वट
नितीन गडकरींचा वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शुभेच्छांचे टिष्ट्वट केले. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,  गृहमंत्री राजनाथ सिंग, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांनी गडकरींना फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकाळी गडकरींना फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच विविध राज्याचे मुख्यंमंत्र्यांकडून सुद्धा त्यांना शुभेच्छा संदेश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह  विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना  टेलिफोनद्वारे संपर्क करून शुभेच्छा दिल्या. 


Web Title: A crowd of fans to make to wish birthday of Nitin Gadkari in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.