नागपूर : उपराजधानीतील नागरिकांमध्ये पारपत्र काढण्यासंदर्भात जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात ८० हजारांहून अधिक पारपत्र जारी करण्यात आले. पारपत्रासाठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे सव्वाबारा कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. तत्काल पारपत्रांतूनच दीड कोटींहून अधिक शुल्क प्राप्त झाले. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पारपत्र कार्यालयास १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत किती पारपत्र जारी करण्यात आले, यातून किती शुल्क मिळाले, किती अर्ज प्रलंबित आहेत यासारखे प्रश्न विचारले होते. यासंदर्भात पारपत्र कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी ए.जी.नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत ८४ हजार २५१ व्यक्तींनी पारपत्रासाठी अर्ज केले होते. यातील एकही अर्ज रद्द करण्यात आला नाही व वर्षभरात ८० हजार ३०९ व्यक्तींना पारपत्र जारी करण्यात आले.पारपत्र कार्यालयाला पारपत्राच्या शुल्कातून १२ कोटी २४ लाख ४०० रुपयाची रक्कम प्राप्त झाली. यातील १ कोटी ६५ लाख ५६ हजार रुपये तत्काळ पारपत्र शुल्कातून प्राप्त झाले हे विशेष. दरम्यान, वर्षभरात गुन्हेगारी प्रकारामुळे एकही पारपत्र रद्द करण्यात आले नाही. तर २८ व्यक्तींनी पारपत्र रद्द करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली. (प्रतिनिधी)
पारपत्र शुल्कातून जमा झाले सव्वाबारा कोटी
By admin | Updated: June 21, 2014 02:41 IST