लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरीच्या मोबाईलवरून निर्माण झालेल्या वादानंतर तीन गुन्हेगारांनी त्यांच्याच एका साथीदारावर चाकूहल्ला करुन त्याला जबर जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. शाहरुख इक्बाल शेख (वय २५) असे जखमीचे नाव आहे.
दातऱ्या, शुभम चाफले आणि चुस्सू अशी आरोपींची नावे आहेत. जखमी आणि आरोपी हे मित्र असून, त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्डही आहे. शनिवारी रात्री हे सर्व वाठोड्यात बसले होते. चोरीच्या मोबाईलबद्दल शाहरुखने आरोपींना विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी शाहरूखवर चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. जखमी शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
--