जगदीश जोशी नागपूरउपराजधानीत गेल्या अनेक दिवसांपासून ‘क्रिमिनल मॅनेजमेंट सिस्टिम’ चालत आहे. पोलीस, गुन्हेगार, नेता आणि तथाकथित समाजसेवक या व्यवस्थेत सहभागी आहेत. त्यांच्यात एक अतुट संबंध निर्माण झाले असून, त्यामुळे शहरात गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत आहे. परिणामी गुन्ह्याचे खरे कारण पुढे येत नाही. खरे सूत्रधारही त्यामुळेच सहीसलामत राहतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनांच्या घटनासुद्धा याच ‘सिस्टीम’च्या यशस्वीतेची साक्ष देत आहेत. सर्वप्रथम २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ झालेल्या घुग्घुस येथील कोल माफिया सगीर सिद्दीकी याच्या खुनाचीच घटना घेता येईल. सगीरला एका भूमाफियाच्या वाहनातच गोळी मारण्यात आली होती. उपचारादरम्यान ८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी सगीरसोबत कारमध्ये गुन्हेगार जाकीर खान, शक्ती मनपिया, आशिष पारोचो बसले होते. तेव्हा सगीर कार चालवीत होता. गोळी लागल्यामुळे कार एका वकिलाच्या कार्यालयात घुसली होती. त्यामुळे पोलीस या घटनेला अगोदर अपघातच समजत होते. सगीरच्या साथीदारांनीसुद्धा हा एक अपघात असल्याचाच देखावा केला होता. डॉक्टरांनी गोळी लागल्याचे सांगितल्यावर पोलीस कामाला लागले आणि तिघांनाही ताब्यात घेतले. शक्तीने चुकून गोळी चालल्याची कबुली दिली. त्याने घटनेच्या पूर्वी तो स्वत: असाध्य आजाराने ग्रस्त असल्याचे दस्तऐवज तयार करून घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याच गोष्टीवर विश्वास ठेवून या प्रकरणामागील सत्य शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. पोलिसांनी आरोपींची शस्त्रे लपविणारा विकास ऊर्फ पप्पू डागोर याला अटक केली. पोलीसांनी त्याच्याकडूनही माहिती काढण्याचा प्रयत्न केला नाही, कारण पोलीस एका ठरलेल्या योजनेनुसारच काम करीत होते. सगीरच्या खुनामुळे अनेकांची चांदी झाली होती. त्यांची मदत करणे पोलिसांसाठी फायद्याचा सौदा होता. या सौद्यामुळेच साडेचार महिन्यानंतरही हाजी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. सूत्रानुसार खून केल्यानंतर तत्काळ चंद्रपूरच्या कोळसा माफियांनी पोलिसांच्या तपासाची दिशासुद्धा ठरवून दिली होती. कोळशाच्या तस्करीत सगीरचे अनेक वर्षांपासून त्याचा प्रतिस्पर्धी समीर आणि हाजी यांच्याशी वैमनस्य सुरू होते. सगीरला दर महिन्याला एक कोटी रुपयाची कमाई होत होती. ही गोष्ट त्याच्या प्रेयसीनेसुद्धा पोलिसांसमोर कबूल केली होती. दुसरे प्रकरण १३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासाजवळ झालेल्या रितेश बैसवारे याच्या हत्येचे आहे. रितेशचा सकाळी ९.३० वाजता जिमला जाताना धरमपेठ चौकातच खून करण्यात आला होता. त्याला योजनाबद्ध पद्धतीने संपविण्यात आले होते. अंबाझरी पोलिसांनी अश्विन तुर्केल, निखील डागोर आणि त्याच्या एका साथीदाराला आरोपी केले होते. घटनास्थळावरच्या सीसीटीव्हीमध्ये सात ते आठ हल्लेखोर असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली असल्याने पोलिसांनी त्यालाही खोटे ठरविले. जेव्हा आरोपीला शोधण्याचे नाटक केले जात होते त्यावेळी त्यांचा संदेशवाहक नेता पोलिसांसोबत दिवस-रात्र होता. तो नेता आरोपींना लहानसहान घडामोडींची माहिती देत होता. त्यांच्या योजनेनुसारच एफआयआरमध्ये नोंद असलेल्या आरोपींनी तत्काळ समर्पणसुद्धा केले होते. रितेश बैसवारे हत्याकांडात पोलीस आणि गुन्हेगारांचे संगनमत असल्याची गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेकडे आरोपींची संख्या नऊ आहे. त्यांनी संबंधित नेत्यांचे बयानसुद्धा नोंदविले आहे. तिसरे प्रकरण सीताबर्डीतील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये झालेल्या व्यापारी भारत खटवानी यांच्या खुनाचे आहे. ७ मार्च रोजी दुपारी खटवानी यांच्या दुकानात घुसून त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. या खुनाचे सूत्रधार शेख शरीफने गणेशपेठच्या गुजरवाडीतील गुन्हेगारांना खटवानीच्या खुनाची सुपारी दिली होती. हा गुन्हेगार पोलीस आणि आपल्या गॉडफादरच्या मदतीने अनेक वर्षांपासून गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे. शरीफने खुनासाठी केवळ पाच हजार रुपये ‘अॅडव्हान्स’ दिले होते. पोलीस घटनेनंतर ’इलेक्ट्रानिक्स सर्व्हिलन्स’वर भर देतात, याची शरीफला माहिती होती.त्यामुळे काम सोपविल्यानंतर त्याने ‘सुपारी किलर्स’शी संपर्क तोडून टाकला. तो घटनेपूर्वी आपल्या विश्वासू साथीदारांसोबत धार्मिक यात्रेला रवाना झाला. आपल्यावर संशय आला तरी आपण बाहेर असल्याने काही होणार नाही, याचा त्याला विश्वास होता. शरीफच्या योजनेनुसार सुपारी किलर्सने सुद्धा खुनानंतर शहर सोडले. उपचारादरम्यान खटवानी मरण पावले. पोलीसही धास्तीत आले. दरम्यान शरीफ गँग मददगार पोलीस कर्मचारी आणि गँगस्टरच्या मदतीने या प्रकरणातून स्वत: वाचण्याची योजना आखू लागले.यातच त्यांच्या मददगार पोलीस कर्मचाऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने त्यांना समर्पण करायला लावले. खुनाच्या १२ दिवसानंतर गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला. गुन्हे शाखेने गुन्हेगारांची मुळे कापण्यासाठी शरीफ गँगच्या १४ सदस्यांच्या विरुद्ध मरोका अंतर्गत गुन्हा दाखल केला.
उपराजधानीला चालवतेय क्रिमिनल ‘मॅनेजमेंट सिस्टीम’
By admin | Updated: April 27, 2015 02:25 IST