आॅनलाईन लोकमतनागपूर : सीताबर्डी पोलिसांवर लुटमारीचा आरोप लावणारा लाकडाचा व्यापारी युसूफ अकबानीविरुद्ध ४८ लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबानीसोबत ठाण्यात झालेल्या मारहाणीनंतर १५ दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करण्यात येत आहे.परवेज पंजवानी, समीर इराणी आणि मोमीन लश्करिया यांनी सीताबर्डी पोलिसांच्या मदतीने आपणास बेदम मारहाण करून ७.७० लाख रुपये घेऊन ४८.५० लाखाचे चेक आणि स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी घेतल्याची तक्रार युसूफ अकबानीने २० नोव्हेंबरला लकडगंज पोलीस ठाण्यात केली होती.युसूफच्या तक्रारीवर भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. युसूफने १८ नोव्हेंबरला लकडगंजच्या पंजाब नॅशनल बँकेतून ७.७० लाख रुपये काढले होते. बँकेतून बाहेर येताच त्याला सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस जबरदस्तीने सोबत घेऊन गेले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. युसूफ आणि खोपडे यांच्या तक्रारीवर कारवाई होण्यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. फसवणुकीच्या प्रकरणाचा फिर्यादी परवेज पंजवानी आहे. परवेजच्या तक्रारीनुसार फेब्रुवारी २०१५ मध्ये युसूफने त्याच्याकडून प्रॉपर्टीच्या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावावर ८० लाख रुपये घेतले होते. हा सौदा झाशी राणी चौकातील एका रेस्टॉरंटमध्ये झाला. ठराविक कालावधीनंतर पैसे परत मागितले असता युसूफने चेक दिले. ज्या खात्याचे चेक दिले ते खाते २०१० पासून बंद झाले होते. चेक बाऊन्स झाल्यानंतर परवेजने पैसे मागितल्यानंतर युसूफने चेकबुक हरविल्याची खोटी तक्रार दाखल केली. दबाव टाकल्यानंतर त्याने ३१ लाख ७० हजार रुपये परत केले. उर्वरित ४८ लाख ३० हजार रुपये देण्यास त्याने नकार दिला.
नागपुरात पोलिसांविरुद्ध लुटमारीची तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्धच फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:29 IST
सीताबर्डी पोलिसांवर लुटमारीचा आरोप लावणारा लाकडाचा व्यापारी युसूफ अकबानीविरुद्ध ४८ लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरात पोलिसांविरुद्ध लुटमारीची तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्धच फसवणुकीचा गुन्हा
ठळक मुद्देआमदार कृष्णा खोपडे यांनी केलेली तक्रारही धुडकावली