ऑडिशनसाठी महामंडळच पुरवेल निर्मात्यांना डेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:26 AM2019-08-05T11:26:47+5:302019-08-05T11:27:23+5:30

बोगस ऑडिशन घेऊन नवोदितांना ठगविणाऱ्या खोट्या दिग्दर्शक व निर्मात्यांना चोप देण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेने पुढाकार घेतला आहे.

The corporation will provide data to the makers for auditions | ऑडिशनसाठी महामंडळच पुरवेल निर्मात्यांना डेटा

ऑडिशनसाठी महामंडळच पुरवेल निर्मात्यांना डेटा

Next
ठळक मुद्देकलावंतांची फसवणूक टाळण्यासाठी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस ऑडिशन घेऊन नवोदितांना ठगविणाऱ्या खोट्या दिग्दर्शक व निर्मात्यांना चोप देण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेने पुढाकार घेतला आहे. आता महामंडळातर्फेच चित्रपटासाठी कलावंतांचे ऑडिशन घेऊन, त्याचा डेटा अपडेट केला जाऊन निर्मात्यांना उपलब्ध करवून दिला जाणार आहे.
बनावट बॅनर उभे करायचे, खोटा दिग्दर्शक उभा करायचा आणि कुणी तरी बडा असामी निर्माता असल्याचे भासवून चित्रपटाकरिता कलावंतांसाठी ऑडिशन्स घ्यायचा... असा गोरखधंदा अवघ्या महाराष्ट्रात फोफावत आहे. चंदेरीनगरीचे स्वप्न उराशी बाळगून असलेले नवोदित अभिनेते-अभिनेत्री हमखास या गोरखधंद्याच्या विळख्यात वेढले जात असून, चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसा उकळला जात असल्याचे चित्र वेळोवेळी उघडकीस आले आहे. मात्र, असा गोरखधंदा करणाऱ्यांचे बिंग अद्याप फुटलेले नसल्याने, राजरोस अनेक कलावंत बळी पडत असल्याचे दिसून येते.
अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने ऑडिशन प्रक्रिया स्वत:च घेऊन, त्याबाबतचा डेटा चित्रपट निर्माते अगर दिग्दर्शकांना पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेचा प्रारंभ मंगळवार ६ ऑगस्टपासून नागपुरातून केला जात आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व विदर्भ समन्वयक राज कुबेर यांच्या मुत्सद्देगिरीतून हा पुढाकार महामंडळाने घेतला असून, याचे संपूर्ण समन्वयन नरेंद्र शिंदे व रूपाली मोरे करणार आहेत.
दर आठवड्यात होणार ऑडिशन
चित्रपट निर्मितीचे काही कायदे निश्चित करण्यात आले आहेत. कलावंतांना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना आणि चित्रपटाशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेत सहभागी असलेल्या तंंत्रज्ञांना महामंडळाचे कार्ड काढणे अनिवार्य असते. त्यामुळे कुणावर अन्याय झालाच तर विधिवत कायद्याच्या अनुषंगाने ती प्रकरणे निपटाºयात काढली जाऊ शकतात. त्या अनुषंगाने महामंडळ सभासदांची ऑडिशन दर आठवड्यात घेणार आहे. सध्या विदर्भ शाखेचे दोनशेहून अधिक सदस्य असल्याने, त्यांचे ऑडिशन मंगळवारपासून दररोज घेतले जाईल. जसजसे नव्या सभासदांची नोंदणी होईल, त्यांच्या ऑडिशनसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित केला जाणार आहे.

डेटा असेल महामंडळाच्या संकेतस्थळावर
विदर्भात जो कुणी चित्रपट बनवत असेल किंवा मुंबई-पुण्याच्या निर्मात्यांना चित्रपटात विदर्भातील कलावंत हवे असतील, त्यांच्यासाठी ऑडिशनचा संपूर्ण डेटा महामंडळाच्या संकेतस्थळावर असेल. त्यामुळे त्यांना ऑडिशन घेण्याची गरज पडणार नाही. या प्रक्रियेमुळे कलावंतांशी आणि निर्मात्यांशीही दगाफटका होणार नाही.
चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुकर होईल - मेघराज राजेभोसले
ऑडिशनच्या नावावर कलावंतांशी दगाफटका होत असल्याच्या गोष्टी अनेकदा कानावर पडल्या. यामुळे निर्मात्यांची नाहक बदनामी होत असते. मी स्वत: चित्रपट निर्माता असल्याने या गोष्टी कीती गंभीर आहेत, याची जाणीव मला आहे. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

Web Title: The corporation will provide data to the makers for auditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.