गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च २०२० मध्ये कोरोना आला तेव्हा तो सर्वांसाठीच नवा होता; परंतु कोरोना संकट दीर्घ कालावधीसाठी राहील असा अंदाज होता. या दृष्टीने महापालिकेने स्वत:ची रुग्णालये अपग्रेड करून युद्धपातळीवर नियोजन केले असते, तर आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४२२ ऑक्सिजन बेडची व्यवस्था शक्य झाली असती; परंतु वर्षभरात नुसत्या बैठका, पदाधिकाऱ्यांचे पाहणी दौरे व घोषणा सुरू आहे. आज मनपा रुग्णालयात जेमतेम १५४ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूर शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे वजनदार नेते असलेल्या भाजपची सत्ता असूनही मनपाची यंत्रणा कोविड रुग्णांवर उपचार करण्यात सपशेल फेल ठरली आहे.
मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता १२६ बेडची आहे. येथे ९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसोलेश दवाखान्याची ३२ बेडची क्षमता आहे; परंतु येथे जेमतेम १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४४ बेड क्षमतेच्या आयुष हॉस्पिटलमध्ये ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा प्रकारे १५४ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वास्तविक मनपाने वेळीच नियोजन केले असते, तर आज अपग्रेड केलेल्या पाच रुग्णालयांत ४२२ ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले असते. केटीनगर हॉस्पिटल वर्षभरापूर्वी अपग्रेड करण्यात आले. येथे ११० बेड, तर पाचपावली सुुतिकागृहात ११० बेडची व्यवस्था याआधीच करता आली असती. आज कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असता.
...
मनपाचे ऑडिटर कशासाठी?
कोविड रुग्णांना उपचार मिळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे; परंतु मेयो, मेडिकल व एम्स रुग्णालयांवर कोविड रुग्णांचा भार आहे. १२१ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याला परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट सुरू आहे. सर्वसामान्य व गरीब रुग्णांना या रुग्णालयात उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. मनपाने ऑडिटर नियुक्त केले; परंतु गरीब रुग्णांची लूटमार थांबलेली नाही. अशा किती रुग्णालयांवर दररोज कारवाई केली जाते. याची आकडेवारी मनपातर्फे जारी का केली जात नाही.
....
वर्षभरात डॉक्टरांची नियुक्ती नाही
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनपाने ५२२ आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी नियुक्ती केली होती. यात डॉक्टरांचाही समावेश होता; परंतु पहिली लाट ओसरताच कर्मचारी कमी करण्यात आले. आता डॉक्टर व कर्मचारी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. वर्षभरात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली असती तर आज ही वेळ आली नसती. वर्षभरात डॉक्टर का नियुक्त केले नाहीत, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.
....
आर्थिक तरतूद का नाही?
कोविडचे संकट दीर्घकाळ राहील याची जाणीव असूनही मनपा प्रशासनाने यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली नाही. स्थायी समिती व सभागृहात मंजुरी घेता आली असती; परंतु प्रशासनाने असा प्रस्ताव आणला नाही. पदाधिकाऱ्यांनाही याची गरज भासली नाही. शहरातील सिमेंट रोड वर्ष-दोन वर्ष थांबले तरी फार काही फरक पडला नसता. हा निधी कोविडसाठी वळवता आला असता; परंतु पदाधिकारी व प्रशासनाने सिमेंट रोडला प्राधान्य दिले.
...
मनपाची रुग्णालये व बेड क्षमता दाखल रुग्ण
इंदिरा गांधी - १२६ ९६
आयसोलेशन ३२ १६
आयुष ४४ ४२
केटीनगर ११० ००
पाचपावली ११० ००
एकूण ४२२ १५४