सुमेध वाघमारे
नागपूर : दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोेनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातच मेडिकलच्या एका निवासी डॉक्टरला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर(इम्युनटी)देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. विदर्भात अशी काही प्रकरणे दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु यासंदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, आवश्यक काळजी न घेतल्यास रि-इन्फेक्शनचा धोका राहू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ३१ वर्षीय निवासी डॉक्टरला कोविडची लक्षणे दिसून आल्याने ११ सप्टेंबर रोजी चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. चार दिवसांनी, १४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णाला सात दिवस फॅविपीरॅवीर औषध देण्यात आले. २० नाेव्हेंबर रोजी कोरोनाची चाचणी करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आला. दोन महिन्यानंतर आता पुन्हा लक्षणे दिसून आल्यावर १९ नोव्हेंबर रोजी चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकरणावरून दोन महिन्यातच इम्युनिटी संपली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- कोरोनाचे मृत विषाणू अनेक आठवडे शरीरात असतात
तज्ज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर, त्याचे मृत विषाणू कित्येक आठवडे शरीरात राहतात, ज्यामुळे संबंधित व्यक्तीचा अहवाल सकारात्मक येऊ शकतो. यापूर्वी, कोरोनामध्ये वारंवार संसर्ग झाल्याचा घटनाही घडल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांच्यानुसार, रि-इन्फेक्शनची काही प्रकरणे आढळून आली आहेत. परंतु त्याची कुठे नोंद नाही.
- खबरदारीच्या उपाययोजना सर्वांसाठी आवश्यक
श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्यानुसार, रि-इन्फेक्शनचे रुग्ण भारतात काही ठिकाणी आढळून आले आहेत. यामुळे याचा डाटा असणे व त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. परंतु याचा निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार आहे. यामुळे ज्यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांनी आणि इतरांनीही योग्य दर्जेचा मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वारंवार हात धुणे या खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.