लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य यंत्रणेने कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आता लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. ती वितरित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ही लस वितरित करण्याचे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान आहे. मनपामध्ये उपलब्ध डाटा बेसचा आधारे लसचे वितरण केल्या जाणार आहे. त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी केले.
महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यासाठी बुधवारी आयोजित कार्यशाळेत आयुक्त बोलत होेते. यावेळी कार्यकारी महापौर मनिषा कोठे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आादी उपस्थित होते.
कोरोनावरील लस सार्वजनिक रूपात उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला पुरवठा कमी होणार असल्याने केंद्र स्तरावर त्याची प्राथमिकता निश्चित करण्यात येत आहे. त्यादृष्टीने शहरातील डेटा बेस तयार करणे, महत्त्वाचे आहे.
फूट सोल्जर तयार करण्याचे आव्हान
मनपाच्या सहा रुग्णालयांचा कायापालट करून प्राणवायू असलेल्या बेडची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जरी आपल्याकडे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नसले तरी आहे त्या व्यवस्थेत संपूर्ण सेवा अखेरच्या व्यक्तींपर्यंत पोहचविण्यासाठी फूट सोल्जर तयार करणे, हे संपूर्ण नियोजन तातडीने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डेटाबेस तयार करण्याची कार्यवाही सुरू
लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा डेटाबेस तयार करण्याचे काम मनपाद्वारे सुरू आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनी सुद्धा आपली माहिती सादर करणे अनिवार्य आहे.
............