कामठी : कामठी तालुक्यातील पवनगाव, धारगाव, लिहीगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जात आहे. पण यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसमारंभांवर बंदी आल्याने फुलाच्या मागणीत घट झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागात गत १५ लॉकडाऊनसदृश परिस्थिती असल्याने फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. नोव्हेंबरमध्ये अनलॉकच्या प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फुल शेतीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. पवनगाव,धारगाव, लिहीगाव येथे शेवंती, पांढरा डीजी,गेंदा ,गुलाब या फुल झाडांची लागवड केली. मात्र उत्पादन हाती येताच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभावर बंदी घातली आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फुल बाजारात आज १५ ते २० रुपये प्रति किलो शेवंती, गेंदा, पाढरा डीजी फुल विकल्या जात आहे. बाजारात फुलांना मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेनासा झाला असल्याचे पवनगाव येथील पुरुषोत्तम नागपुरे, लिहीगावचे गणेश झोड यांनी सांगितले.
फूलशेतीला कोरोना प्रादुर्भावाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST