लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लंडनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार पुढे आल्यानंतर जगभरात खबरदारीची पावले उचलली जात आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात तसे दिसत नाही. त्यामुुळे रेल्वे गार्ड्सवर कोरोना संक्रमणाचे सावट निर्माण झाले आहे. ट्रेनचे ब्रेकव्हॅन आणि एसएलआर बोगींचे निर्जतुकीकरण होत नसल्याने ही भीती आहे.
कोरोना संक्रमण काळात टाळेबंदीमध्ये रेल्वे गार्ड्सने मालगाड्या, श्रमिक स्पेशल आणि अन्य स्पेशल ट्रेनचे संचालन केले. त्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रवासी आणि अत्यावश्यक वस्तूंच्या परिचालनाची जबाबदारी सांभाळली. त्यांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आऊटसोर्सिंगद्वारे ब्रेकव्हॅन, एसएलआरमध्ये सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर मात्र आऊटसोर्सिंग बंद करण्यात येऊन हे काम पॉईंटमॅनद्वारे करण्यात येऊ लागले. गेल्या १५ दिवसापासून सॅनिटायझेशनचे काम बंद पडल्याचे ऑल इंडिया गार्ड्स काैन्सिलचे केंद्रीय उपाध्यक्ष एस.के. शुक्ला यांनी सांगितले. केवळ रेल्वे इंजिनाचेच निर्जंतुकीकरण केले जात आहे. यामुळे रेल्वे चालक, सहायक रेल्वे चालकाला कोरोपासून बचावाची हमी मिळत आहे. परंतु, रेल्वे गार्ड्सकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविकत रेल्वे गार्ड्सच्या ब्रेकव्हॅनमध्ये सी ॲण्ड डब्ल्यू, कमर्शियल, ईटीसी आदी विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचा राबता असतो. अशात एखादा कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्यास, त्याचा संसर्ग रेल्वे गार्डला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ब्रेकव्हॅन आणि एसएलआरमध्ये नियमित तत्त्वावर निर्जंतुकीकरणाची सोय करण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नागपूर मंडळासोबतच रेल्वे गार्ड्स अन्य मंडळातही जाऊन काम करतात. त्यामुळे, संबंधित रेल्वे मंडळांनाही याबाबत सूचना देऊन रेल्वे गार्ड्सला कोरोनाच्या धोक्यापासून वाचविण्याची मागणी काैन्सिलने मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ परिचालक व्यवस्थापकांकडे केली आहे.
............