नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातही होऊ शकते कोरोनाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:22 AM2020-03-19T11:22:01+5:302020-03-19T11:24:28+5:30

देशात विषाणूंचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यस्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona examination may also be done at a medical college in Nagpur | नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातही होऊ शकते कोरोनाची तपासणी

नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातही होऊ शकते कोरोनाची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देविषाणू संशोधन प्रयोगशाळेला हवा बूस्टर डोज ‘डीएमईआर’ने लक्ष देणे गरजेचे

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात विषाणूंचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यस्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उभारण्याचा निर्णय घेतला. ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) चमूने मेडिकलची पाहणीही केली. पहिल्या टप्प्यातला निधीही मिळाला. परंतु पुढील प्रक्रिया खोळंबली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने या प्रयोगशाळेला ‘बूस्टर डोज’ दिल्यास मेडिकलमध्येही कोरोना विषाणूचे नमुने तपासणे शक्य होईल.
गेल्या वर्षी विदर्भात स्क्रब टायफस व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. स्वाईन फ्लूची दहशत कायम आहेच. आता कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती वाढली आहे. पूर्वी या आजाराच्या संशयित रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. दरम्यान, २०१३-१४ मध्ये दोन प्रादेशिक, चार राज्यस्तरीय व देशातील आठ विषाणू प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपुरातील मेयोला ही विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा आली. परंतु निधी, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध न झाल्याने काही चाचण्यांपुरतीच ही प्रयोगशाळा मर्यादित राहिली. गेल्या वर्षी पुन्हा केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागांतर्गत १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत साथीचे आजार व नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळेचे जाळे निर्माण करण्याची योजना आखली. त्यानुसार महाराष्ट्रात ‘विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यात नागपूरच्या मेडिकलला राज्यस्तरीय प्रयोगशाळा, तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयस्तरीय प्रयोगशाळा स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी ‘आयसीएमआर’च्या द्विसदस्यीय चमूने मेडिकलची पाहणी करून मंजुरीचा अहवालही दिला. या प्रयोगशाळेचा खर्च केंद्र शासन उचालणार असून राज्याला केवळ जागा उपलब्ध करून द्यायचे होती. सूत्रानुसार, जागेला व प्रयोगशाळेला घेऊन सामंजस्य करार झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर चर्चाही झाली. परंतु पुढील प्रक्रिया थंडबस्त्यात पडली आहे.
काही तासांतच मिळेल अहवाल
कोरोना विषाणूचे सर्वाधिक संशयित रुग्ण मेडिकलमध्ये येत आहेत. आतापर्यंत ७४ नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. परंतु या प्रयोगशाळेत विदर्भासह आजूबाजूच्या राज्याच्या नमुन्यांचाही भार असल्याने तपासणीस उशीर होत आहे. मेडिकलची ही प्रयोगशाळा तातडीने सुरू झाल्यास याचा फायदा रुग्णांची उपचाराची दिशा ठरविण्यास होणार आहे.

Web Title: Corona examination may also be done at a medical college in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.