नागपुरातील हॉटेलमधील कूकच्या हत्याकांडाचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:18 PM2020-05-25T21:18:34+5:302020-05-25T21:20:48+5:30

सीताबर्डीतील हॉटेल खालसाच्या कूकची हत्या त्याचे तीन लाख रुपये लुटण्यासाठी झाली. मृताच्या सोबत काम करणाऱ्या तीन आरोपींनीच ही हत्या केल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य सूत्रधाराला सीताबर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक करून नागपुरात आणले.

Cook's murder in a hotel in Nagpur revealed | नागपुरातील हॉटेलमधील कूकच्या हत्याकांडाचा खुलासा

नागपुरातील हॉटेलमधील कूकच्या हत्याकांडाचा खुलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डीतील हॉटेल खालसाच्या कूकची हत्या त्याचे तीन लाख रुपये लुटण्यासाठी झाली. मृताच्या सोबत काम करणाऱ्या तीन आरोपींनीच ही हत्या केल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य सूत्रधाराला सीताबर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक करून नागपुरात आणले. सतीश ऊर्फ बबलू रामराईस तिवारी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो हनुमाना तालुक्यातील (जिल्हा रीवा, मध्य प्रदेश) रहिवासी आहे. लोकमत चौकाजवळ फिर्यादी जसपालसिंग गुरमितसिंग बादल (वय ४८) यांचे हॉटेल खालसा आहे. लॉक डाऊनमुळे हॉटेल बंद असले तरी हॉटेलमध्ये कूक असलेला शंकर आणि अन्य तीन कर्मचारी हॉटेलमध्येच राहत होते. शंकर हा अनाथ होता. तो रात्रंदिवस हॉटेलमध्येच काम करायचा आणि तेथेच राहायचा. त्याने आपल्या पगारातून तीन लाख रुपयांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम तो जवळच ठेवायचा. लॉकडाऊनमुळे सोबत राहत असल्याने आरोपींना या रकमेचा सुगावा लागला. त्यांनी ती रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकरने आरोपी तिवारी आणि अन्य दोघांचा तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे आरोपीने त्याच्या डोक्यावर लोखंडी खलबत्त्याचा वार करून त्याला जखमी केले. नंतर त्याचे हात-पाय आणि तोंड नारळाच्या दोरीने बांधले. तोंडाला सेलोटेप चिटकवली आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळून हॉटेलमधून आरोपी पळून गेले. शंकर याच्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे ती घटना १४ मे रोजी उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह मेडिकलला पाठविल्यानंतर हॉटेल मालक जसपालसिंग बादल यांच्याकडून हॉटेलमध्ये काम करणाºया आरोपींची नावे माहीत करून घेतली. त्यातील मुख्य आरोपी सतीश ऊर्फ बबलू तिवारी याने एक नवीन मोबाईल घेऊन त्याच्यात जुने सिम कार्ड टाकून वापरणे सुरू केले होते. तो धागा पकडून पोलिसांनी आरोपी तिवारीला मध्य प्रदेशच्या सीमेवरील बशीगडा गावात जाऊन अटक केली. त्याच्याकडून शंकरकडून लूटलेल्या तीन लाखांपैकी ५२ हजार रुपयांची रक्कम तसेच एक मोबाईल जप्त केला.
अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत, निरीक्षक विकास दिंडोरी यांच्या नेतृत्वात एपीआय किशोर शेरकी, पीएसआय प्रवीण सूरकर, हवालदार शंकर कोडापे, अजय काळे, नायक विशाल अंकलवार, ओमप्रकाश भारतीय, संदीप भोकरे, प्रीतम यादव, युवराज मते, प्रफुल्ल मानकर, गणेश जोगळेकर, पंकज निकम आणि विक्रम ठाकूर यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Cook's murder in a hotel in Nagpur revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.