Continue the process of filling vacancies of 'LIT' | ‘एलआयटी’मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवा
‘एलआयटी’मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवा

ठळक मुद्देहायकोर्टाचा ग्रीन सिग्नल आचारसंहिता लागू होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) येथील प्राध्यापक व इतरांची १७ रिक्त पदे भरण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. पदभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या पदभरतीला लागू होणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.
यासंदर्भात एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य प्रसन्न सोहळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पदभरतीची प्रक्रिया थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती देऊन यासंदर्भात आवश्यक आदेश देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही विनंती मान्य केली.
एलआयटी ख्यातनाम संस्था असून या संस्थेचे विद्यार्थी जगभरात उच्च पदावर कार्यरत आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून संस्थेकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. संस्थेत प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसह विविध आवश्यक सुविधांचा अभाव आहे. परिणामी संस्थेचे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापासून वंचित रहात आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत चालली आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
रिक्त पदे भरण्यासह एलआयटीला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रोहित जोशी, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील तर, एलआयटीतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट यांनी कामकाज पाहिले.


Web Title: Continue the process of filling vacancies of 'LIT'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.