Contempt Notice of High Court to Maple Jewelers in Mumbai | मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला हायकोर्टाची अवमानना नोटीस
मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला हायकोर्टाची अवमानना नोटीस

ठळक मुद्देबेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयांसाठी बँक हमी सादर करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अवमानना नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.
२५ मार्च २०१९ रोजी मॅपल ज्वेलर्सने ही बेहिशेबी रक्कम परत मिळविण्यासाठी बँक हमी सादर करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने बँक हमी सादर करा व ही रक्कम घेऊन जा असे निर्देश मॅपल ज्वेलर्सला दिले होते. परंतु, मॅपल ज्वेलर्सने स्वत:चा शब्द पाळला नाही. आयकर विभागाने याकडे लक्ष वेधले असता न्यायालयाने मॅपल ज्वेलर्सला फटकारले. तसेच, अवमानना नोटीस बजावली. या बेहिशेबी रकमेसाठी आयकर विभागाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कायद्यानुसार ही रक्कम आयकर विभागाच्या तिजोरीत जमा होणे आवश्यक आहे विभागाचे म्हणणे आहे.
नंदनवन पोलिसांनी २९ एप्रिल २०१८ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास पारडी मार्गावरील प्रजापती चौकाजवळ एमएच ३१/एफए/४६११ क्रमांकाची कार ताब्यात घेतली होती. कार नंदनवन ठाण्यात आणल्यानंतर मनीष खंडेलवाल या व्यक्तीने कारमधील लॉकरची चावी उपलब्ध करून देऊन त्यात ५ कोटी ७३ लाख रुपये असल्याची माहिती दिली. रोकड मोजल्यानंतर ती केवळ ३ कोटी १८ लाखच भरली. त्यामुळे कारमधील २ कोटी ५५ लाख रुपये लंपास करण्यात आल्याचा आरोप मनीषने केला. त्यानंतर आवश्यक कारवाई करून लंपास झालेली रक्कम परत मिळविण्यात आली. ही सर्व रक्कम आपली आहे, असा दावा मॅपल ज्वेलर्स करीत आहे. आयकर विभागातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.


Web Title: Contempt Notice of High Court to Maple Jewelers in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.