तयारीसाठी अशोक चव्हाण दाखल : नेत्यांसह शहर व जिल्हा काँग्रेसची आज बैठकनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ८ डिसेंबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा काँग्रेसने चांगलाच मनावर घेतला आहे. गेल्या वेळी नव्या सरकारला घेरण्यासाठी काढलेला मोर्चा फेल ठरला होता. यावेळी मात्र वर्षपूर्ती झालेल्या सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने ताकद लावली आहे. मोर्चाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले असून, दोन दिवस ते नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत. बुधवारी दिवसभर ते काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा मुद्दा घेऊन काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण कसून परिश्रम घेत असून, मोर्चाच्या नियोजनासाठी त्यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे वेळकाढू धोरण अवलंबिणाऱ्या काँग्रेस नेत्यांची झोप उडाली आहे. चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात येत विदर्भातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर मोर्चासाठी कुठपर्यंत नियोजन झाले, याचा आढावा घेण्यासाठी चव्हाण मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. बुधवारी सकाळी १० वाजता चव्हाण यांनी नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, दोन्ही लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार तसेच शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची बैठक बोलाविली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत चव्हाण हे या प्रमुख नेत्यांवर मोर्चाची जबाबदारी विभागून देणार असून, ‘टार्गेट’ही निश्चित करून देणार आहेत. या बैठकीनंतर सकाळी ११ वाजता चव्हाण हे देवडिया काँग्रेस भवनात जाऊन शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व महापालिकेतील नगरसेवकांना मार्गदर्शन करतील. मोर्चासाठी नगरसेवकांवरही प्रभागनिहाय जबाबदारी सोपविली जाणार आहे. यानंतर दुपारी १२.३० वाजता जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ग्रामीणचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांकडून आढावा घेतील. मुंबईतील बैठकीत उपस्थित राहू न शकलेल्या विदर्भातील नेत्यांशीही तब्बल दोन तास ते चर्चा करतील. मोर्चात विदर्भातील जास्तीतजास्त लोकांना कसे सहभागी करून घेता येईल, याची रणनीती या बैठकीत आखली जाणार आहे. (प्रतिनिधी)विधान परिषदेचा उमेदवार ठरणारअधिवेशनानंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आहे. मात्र, या निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण हे नागपूर आणि शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमेदवार निवडीबाबत मते जाणून घेतील. या बैठकीत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल. इच्छुक उमेदवारांचेही मत विचारात घेतले जाईल. यानंतर मुंबईहून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल.
काँग्रेसने मोर्चा घेतला मनावर
By admin | Updated: December 2, 2015 03:03 IST