नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यालयात सन्नाटा होता. नेतेच नव्हे तर कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या कार्यालयाकडे पाठ दाखविली.मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता प्रारंभ होताच विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मतमोजणीचा अंदाज घेत कार्यालयात बसले होते. सकाळी १० वाजतापासून सर्वच भागात भाजपाच्या उमेदवार आघाडी घेत असल्याचे लक्षात येताच इतर पक्षांच्या कार्यालयातील गर्दी कमी होऊ लागली. ११ वाजेपर्यंत भाजपाचे कार्यालय सोडल्यास इतर सर्वच कार्यालयात निरुत्साह संचारला होता. देवडिया भवनात व मतमोजणी केंद्राकडे काँग्रेसचे नेतेच नाही तर कार्यकर्तेही फिरकलेसुद्धा नाही. भवनाच्या मुख्य द्वाराला आतून कुलूप लावण्यात आले होते. बाहेर पोलिसांशिवाय कुणीच नव्हते. असेच चित्र शिवसेना कार्यालयातील होते. येथे ‘शटर’ बंद आणि पोलिसांचा पहारा तेवढा फक्त दिसून येत होता, तर गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्याही कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. उत्तर नागपुरातील बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयात मात्र कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी होती. हरलो असलोतरी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. भाजप कार्यालयात सकाळी उत्साहाचे वातावरण होते, परंतु कार्यकर्त्यांची फारशी वर्दळ दिसून आली नाही. परंतु राहून-राहून फटाके फोडले जात होते. सायंकाळच्यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीत रॅली काढून जल्लोष केला. (प्रतिनिधी)
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यालयात ‘सन्नाटा’
By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST