लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २६ ते ३१ डिसेंबर १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. पक्षासाठी मोठी संधी आहे. परंतु काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना मात्र या ऐतिहासिक घटनेचा विसर पडला. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारच्या अंकात यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘काँग्रेस से सिर्फ लेने का... देने का नही’ या शिर्षकांतर्गत प्रकाशित केले. या वृत्तानंतर काँग्रेस नेते झोपेतून खडबडून जागे झाले. घाईघाईने शताब्दी स्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. इतकेच नव्हे तर महाल येथील देवडिया काँग्रेस भवन अनेक वर्षानंतर रोषणाई करून सजवण्यात आले.
काँग्रेसमुळेच नागपुरातील अनेक नेते मोठे झाले. गल्लीतून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात त्यांचे नाव झाले. मात्र त्याच नागपुरात झालेल्या अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवासाठी एकाही नेत्याने पुढाकार घेतला नाही. या पार्श्वभूमीवर लोकमतने शुक्रवारच्या अंकात यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘प्रकाशित केले. लोकमतची बातमी वाचून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. सामान्य कार्यकर्ता ते नेते एकमेकांना फोन करून विचारणा करू लागले. अखेर घाईघाईने २६ डिसेंबर राेजी सायंकाळी ५ वाजता शताब्दी स्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकच जाहीर करण्यात आले.
गटबाजी मात्र कायम, वेगवेगळे कार्यक्रम
लोकमतच्या वृत्तानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे डोळे उघडले. त्यांनी शताब्दी स्मरणाचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र यातही शहर काँग्रेसमधील गटबाजी कायम आहे. पक्षातील वेगवेगळ्या गटाने आपापले वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. शहर काँग्रेससाठी ही एक चांगली संधी होती. परंतु ही संधीही स्थानिक नेत्यांना साधता आली नाही. शहर काँग्रेसने सायंकाळी ५ वाजता देवडिया काँग्रेस भवनात कार्यक्रम आयोजित केल्याचे जाहीर केले. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर आदी उपस्थित राहतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनाही प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु राऊत आणि माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी सकाळी ९ वाजता चितार ओळ येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमात नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांच्यासह माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, कृष्णकुमार पांडे, तानाजी वनवे, नितीन कुंभलकर आदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी आपापल्या समर्थकांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.