Congress determination for Vidhansabha : Conclave at Nagpur on 2 July | काँग्रेस करणार विधानसभेसाठी संकल्प :  २ जुलै रोजी नागपुरात मेळावा
काँग्रेस करणार विधानसभेसाठी संकल्प :  २ जुलै रोजी नागपुरात मेळावा

ठळक मुद्देचव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांना निमंत्रण

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता शहर काँग्रेसने नव्याने विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसण्याची तयारी चालविली आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्याना बूस्ट देण्यासाठी संकल्प मेळावा आयोजित करून काँग्रेसजन विजयाचा संकल्प करणार आहेत.
शहर काँग्रेसतर्फे २ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता नागपुरातील देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय दिल्लीतील काही प्रमुख नेत्यांनाही पत्र पाठवून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर काहीसे हताश झालेल्या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भाषणांच्या माध्यमातून चार्ज करणे तसेच निवडणुकीसाठी कार्यक्रम सोपवून कामाला लावणे हा या मागील मुख्य उद्देश आहे.
नागपुरातील सभेत सहाही विधानसभा मतदारसंघातील नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. विधानसभेसाठी कशी तयारी करायची, पक्ष संघटन बळकटीसाठी काय करायचे, बूथवर कार्यकर्ते कसे सक्रिय करायचे. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कोणकोणते अभियान राबविता येईल, या सर्व बाबींवर या सभेत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
विधानसभेसाठी अर्ज गेले
 विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांकडून प्रदेश काँग्रेसने ६ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागितले आहेत. शहर काँग्रेस कमिटीमार्फत देवडिया भवनातून अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. बुधवारपर्यंत १५ जणांनी अर्ज नेले होते.


Web Title: Congress determination for Vidhansabha : Conclave at Nagpur on 2 July
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.