रेस्टॉरंटमध्ये तोडफोड : आधी माफीनामा, नंतर धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यधुंद तरुणी आणि तिच्या साथीदाराने धरमपेठमधील एका रेस्टॉरंटमध्ये गोंधळ घातला. तेथे तोडफोडही केली. प्रकरण पोलिसांकडे जाऊ नये म्हणून आधी माफी मागितली आणि आठ दिवसांनंतर रेस्टॉरंटच्या मालकाला शिवीगाळ करून धमकी दिली.
हे प्रकरण १५ मेच्या रात्रीचे आहे. धरमपेठमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये रात्री विवेक चंद्वानी मद्यधुंद मैत्रिणीसह कारने पोहोचला. तेथे किरकोळ कारणावरून त्याने रेस्टॉरंटमधील वेटर तसेच संचालकांशी वाद घातला. हाणामारी करून तोडफोडही केली. गौरांग नामक तरुणाने पोलिसांना त्याची माहिती दिली. आरोपी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या कारची चावी ताब्यात घेतली. त्यामुळे कारमध्ये असलेली मद्यधुंद तरुणी घाबरली. तिने विवेकच्या कृत्याबद्दल माफी मागून तोडफोडीसाठी पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली. दरम्यान, प्रकरण मिटले असताना शुक्रवारी, शनिवारी विवेकचा गौरांगसोबत पुन्हा वाद झाला. यावेळी त्याने शिवीगाळ करून धमकी दिली, अशी तक्रार गौरंगने सीताबर्डी पोलिसांकडे नोंदवली.
---
तिचीही तक्रार
या प्रकरणात ‘त्या’ तरुणीनेही पोलिसांकडे तक्रार दिली. गौरांगवर अश्लील शिवीगाळ तसेच विनयभंगाचा आरोप तिने लावला. ठाणेदार अतुल सबनीस दोन्ही तक्रारींची चौकशी करत आहेत.