कोविड कालावधीत एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान मनपाची बससेवा जवळपास बंद होती. मोजक्याच बस सुरू होत्या. असे असूनही डिम्टसला या कालावधीत ३ कोटी ८६ लाख ४५ हजार ४८४ रुपयाचे बिल देण्यात आले. कंपनीकडून १८४ कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात लॉकडाऊन कालावधीत कोरोना रुग्णांच्या सेवेत ६० ते ७० बस होत्या. असे असूनही या कंपनीने दर महिन्याला १.१५ कोटीप्रमाणे बिल पाठविले.
वित्त अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानचे बिल कमी करून एप्रिल महिन्याचे ७६ लाख, मेमध्ये ८०, जून ७७ लाख, जुलै ७७ लाख, ऑगस्ट ७८ लाख तर सप्टेंबर महिन्यात ७९ लाखाचे बिल काढले. यावर आक्षेप असूनही आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दर महिन्याच्या बिलात ३० टक्के कपात करून कंपनीला २४ तासात बिल देण्याचे वित्त अधिकाऱ्यांना आदेश दिले, असा आरोप बाल्या बोरकर यांनी केला. दुसरीकडे कंडक्टर व ड्रायव्हरला देण्यासाठी पैसे नसताना डिम्टसला बिल देण्यात आले. या बिलात कपात करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
......
इलेक्ट्रिक बसमध्येही ठरले अडसर
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चर्चेनंतर निविदेत ७७ रुपये दर असलेले इलेक्ट्रिक बसचे भाडे प्रति किलोमीटर ६६ रुपये निश्चित केले होते. केंद्र सरकारकडून यासाठी निधी प्राप्त झाला होता. परंतु नवीन आयुक्त दर कमी करण्याच्या तयारीत आहे. यातून आयुक्त हा उपक्रम मोडित काढण्याच्या विचारात आहे. एप्रिलपासून आजवर १० बससुद्धा सुरू झालेल्या नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द होण्याची शक्यता बोरकर यांनी वर्तविली.